बिलगून बसलेला वेडा राघू पक्ष्यांचा एक छोटा थवा. फोटो: सुजाता तळेगावकर
विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये शीतलहरीचा कहर
न्यूज कट्टा / भंडारा
विदर्भासह नागपूर लगतच्या जिल्ह्यांमध्ये शीत लहर पसरली असून आज दि. 20 डिसेंबर रोजी रात्रीच्या तापमानात कालच्या तुलनेत लक्षणीय घट दिसून आली.
विदर्भातील गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यांत शीत लहरीचा कहर असून हे जिल्हे अक्षरशः गारठले आहेत. भारतीय हवामान खात्यानुसार गोंदिया जिल्ह्यात आज किमान 7.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कालच्या तुलनेत हे तापमान तब्बल 4.6 डिग्रीने कमी आहे. नागपूर जिल्ह्यातील किमान 8.6 अशी नोंद करण्यात आली असून 3.9 डिग्रीची घट आहे. भंडारा जिल्ह्यात अधिकृत आकडेवारी नसली तरी जिल्ह्यातील पिटेझरी गावात आज सकाळी 7.16 वाजता निसर्ग वेध संस्थेनी 8.2 डिग्री सेल्सिअस एवढी नोंद केली आहे.
विदर्भातील इतर शहरांपैकी अकोला 12.6 डिग्री, अमरावती 12.7 डिग्री, बुलढाणा 13.8 डिग्री, ब्रह्मपुरी 10.7 डिग्री, चंद्रपूर 12.6 डिग्री, गडचिरोली 12.2 डिग्री, वर्धा 10.2 डिग्री, वाशिम 13.8 डिग्री आणि यवतमाळ 10.5 डिग्री ची नोंद करण्यात आली आहे.
वेडा राघू बसलाय बिलगून
सध्या नागझिरा लगत पिटेझरी गावात वास्तव्यास असलेले निसर्ग वेध संस्थेचे किरण पुरंदरे यांनी न्यूज कट्टा टीम सोबत बोलताना एक मजेशीर गोष्ट सांगितली. थंडीने अक्षरशः कहर केला असून सध्या हे वनपरिक्षेत्र जणू थंड हवेचे ठिकाण भासू लागले आहे. मनुष्यच नाही तर प्राणी आणि पक्षीही यामुळे प्रभावीत झालेले आहेत. थंडीमध्ये 'वेडा राघू' (ग्रीन बी इटर) हे पक्षी छोट्या थव्यांमध्ये बिलगून बसतात. सध्या हे दृश्य दिसत आहे. वातावरण अतिशय थंड असल्याचे हे सूचक आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'