BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

20417 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

परिकथेतला एक बंगला.. खास मुलाखत...गीतांजली अनिकेत भारती 

खास मुलाखत... गीतांजली अनिकेत भारती 

घराच्या आजुबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि हिरव्या वनराईने नटलेला असेल तर मनाला आणि शरीराला नव चैतन्य लाभते. मात्र सृजनाचा हा अविष्कार अर्थात बाग फुलविण्याची किमया आपण आपल्या हाताने केली असेल तर त्यातून मिळणारा नवनिर्मितीचा आनंद, विरंगुळा, नवचैतन्य आणि उभारी हा साराच कृतकृत्याचा आनंद आहे.... हा अनुभव आणि छंद दररोज जोपासणाऱ्या, जगणाऱ्या गीतांजली अनिकेत भारती यांच्याशी न्यूज कट्टाच्या टीमने केलेली ही खास बातचीत .... 

 

न्यूज कट्टा/ कविता मोरे / नागापुरे 

भंडारा पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो की परिकथेतील एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते. हो, परिकथेतला एक बंगला.. सुमारे  शंभर वर्षे जुना, पण आता त्या बंगल्याचे रूपच पालटले आहे. पूर्वी उजाड, ओसाड असणाऱ्या या वास्तूचे आता वृंदावन झाले आहे. 
हजारोंच्या वर असलेल्या वेगवेगळ्या, रंगबिरंगी कुंड्यामध्ये पाहायला मिळते तुकतुकीत हिरवेगार सौंदर्य. प्रत्येक पानाचा रंग हिरवाच पण तो सुद्धा वेगळा, कुंड्यांमध्ये लगडलेली आणि वाऱ्याच्या झुळकीवर मजेत डोलणारी, एकमेकांशी हितगुज करणारी रंगबिरंगी असंख्य फुलझाडं.. शोभिवंत, सुगंधी फुलापानांची आरास.. विलोभनीय, आकर्षक कुंड्या, पक्षांसाठी बनविलेली खास घरटी, नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त  हिरवाई.. स्वच्छ, चकचकीत अंगण परिसर ... हे सार एका शासकीय निवासस्थानी .... आश्चर्य वाटत असेल पण ही किमया केली आहे निसर्ग वेड्या गीतांजली अनिकेत भारती यांनी ....
भंडारा जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या सुविद्य धर्मपत्नी गितांजली पुरी भारती यांनी निसर्गाला त्याचं देण परत करून नव सृष्टी निर्मितीचा जणू वसाच घेतला आहे. 

आजीने लावले वेड
परभणी विद्यापीठातून  एम.एस.सी. (सॉईल)चे शिक्षण घेणाऱ्या गीतांजली ताई त्यांच्या बागेतल्या प्रत्येक रोपाची, फुलापानांची अगदी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती देतात.  त्या सांगतात की,  बालपणापासूनच निसर्गातील हिरवा रंग माझ्या मनाला गारवा देत आला आहे. फुलझाडांचं वेड मला माझ्या आजीपासून लागलं. चौथा वर्ग शिकलेली आणि पाच दशक गावची सरपंच राहिलेली माझी आजी हिने मला निटनेटकेपणाची सवय लावली असून हा हरित वसा दिला आहे. वडील सुद्धा कृषी विभागात असल्याने त्यांच्यामुळेही माझी मातीशी आणि निसर्गाशी नाळ जोडली गेली.  

झाडांचे घर म्हणजे भारती गुरुजीचे घर 
बीड जिल्ह्यातील वळवणी सारख्या दुष्काळी भागात मी जन्मलेले मात्र माझ्या माहेरच वातावरण कायमच हिरवगार. सासरीही मी हिच हिरवळ पेरली. थोड्याशा जागेतही मी सासरी इतकी झाडे लावली की आमचा पत्ता सांगणारे झाडांचे घर म्हणजे भारती गुरुजीचे घर असे सांगायचे.  त्यामुळे झाडे हिच आमची ओळख असल्याचे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. 

आनंदाचा ठेवा
गीतांजली ताईंनी बंगल्याच्या मागील भागास परसबाग फुलविली असून वांगी, मिरची, कोथिंबीर, मेथी, लसूण, कांदा, चेरी टोमॅटो, फुलकोबी, दोडके, आंबाडी अशा नानाविध भाजीपाल्याचे पीक घेतले आहे. घरीच्या ताज्या आणि रसायनविरहीत भाज्या आहारात असतात. आपण एक बी पेरली की त्याची परतफेड ही माती दाम दुपटीने करते. आपण चिमूटभर पेरतो ते आपल्याला ओंजळभर मिळते. हे दान मी आनंदाने स्वीकारून बागेबद्दल मनात कायम कृतज्ञता बाळगते.  बागेत काम करताना थकवा अजिबात जाणवत नाही. ही माझी बाग नसून माझा श्रमपरिहार ...आनंदाचा ठेवा आहे असे त्या म्हणतात. 

सासरी निघालेल्या लेकीला निरोप देताना जीव तुटतो 
 बदली होवून जायचे असताना देखील तुम्ही प्रत्येक ठिकाणी इतका जीव कसा लावू शकता असे विचारले असता गीतांजली ताई म्हणतात, माझे पती अनिकेत भारती पोलीस अधिकारी पदावर असल्याने माझ्या नशिबी बदलीचे सत्र आणि सर्वत्र वाट्याला येणारी झुडूपी बंगले आहेतच. मात्र फुलझाडांचा छंद असल्याने प्रत्येक नवीन जागी गेल्यावर मी त्या जागेत नंदनवन फुलविते. लेकारांप्रमाणे जीव लावलेल्या माझ्या प्रत्येक रोपट्याला आणि फुलझाडाला जड अंतकरणाने तिथेच सोडून पुढच्या प्रवासाला निघते.. मात्र सासरी निघालेल्या लेकीला निरोप देताना जीव तुटतो अशी त्यावेळी माझी अवस्था होते,  हे सांगताना गीतांजली ताई फारच हळव्या होतात. 

झाडांसाठीचे जैविक कल्चर घरीच करीत असल्याचे त्या सांगतात.. पालापाचोळा, किचन वेस्ट सगळ वापरून कम्पोस्ट खत, शेणखत, जीवामृत घरीच तयार करतो. हाडामासाच्या माणसाप्रमाणे झाडानाही सर्व प्रकारचे जीवनसत्व, न्यूट्रीशीअन, आयर्न लागतात. योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात मिळाल्यास झाडे बहरतात. झाडांना जीव लावल्यास हीच झाडे आम्हांला सढळहस्ते त्यांच्या फळांचे आणि फुलांचे दान करीत असल्याचे गीतांजली ताई म्हणतात...   

घागरीने पाणी घालून मी ती झाडे जागविली

उद्गीर येथे असतानाचा अनुभव त्या सांगतात, उद्गीर हा दुष्काळग्रस्त भाग आहे. आमची तेथे बदली झाली त्यावेळी तेथे पाच वर्ष दुष्काळ होता, पाणी विकत घेण्याइतपत परिस्थिती बिकट होती. तेव्हा मी माझ्या बंगल्याच्या आवारात जवळपास दोनशे ते अडीचशे देशी जातीची झाडे लावली होती. अक्षरशः घागरीने पाणी घालून मी ती झाडे जागविली. आता तो आवार अगदी कोकण झाला आहे.. शिवाय प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला एका झाडाचे नाव देवून त्याला त्या झाडाची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे.

मन कुंडीजवळ वारंवार रेंगाळते

या वेड्या छंदाबद्दल विचारले असता त्या सांगतात की,  घरचे काम आटोपल्यावर ४ ते ५ तास बाग कामासाठी राखलेलाच असतात. झाडे मी विशेष काळजीने, मायेने वाढवते. प्रत्येक रोपट्याकडे, पाकळी पाकळीकडे माझे बारिक लक्ष असते. एखादे फुल फुलले की त्याचं सौंदर्य पाहायला मन कुंडीजवळ वारंवार रेंगाळते. ह्या फुलांसोबत आमची मैत्रीही अधिक फुलत जाते, हे सांगत असताना जवळच असलेल्या पिटूनियाच्या फुलांना त्या हळुवारपणे गोंजारतात.

बागेतल्या फुलांची ओळख करून देताना गीतांजली ताईचे कविमन बोलू लागते...उन्हाळ्यात फुलणारा मोगरा, मधुमालती, अनंत ही फुले मन धुंद करतात. रात्री फुलणारी रातराणी रात्र सुगंधी करते. सकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा जणू मोती पोवळ्यांची रांगोळी घालते अंगणात. तगरीचे फुललेले झाड मला उन्हातील चांदण्या वाटतात. आमच्या बागेतील गुलाब फुलले की बाग श्रीमंत वाटू लागते. मी फुललोय हे सांगण्यासाठी चाफ्याचा सुगंध अगदी घरात येऊन दरवळतो. ऑफिसटाईम न चुकता ऑफिसच्या वेळेवर फुलतो. मोगरा फुलल्यावर सगळा परिसर सुगंधाने प्रसन्न होतो, हे सांगताना त्या अगदी हरवून जातात...

घरचा आधारस्तंभ डळमळू न देता हा छंद जोपासणे  हे सर्वात अवघड

या सर्व धावपळीत सर्वात मोठे आव्हान कोणते आणि त्याला तुम्ही कसे ओव्हरकम केले असे विचारले असता त्या म्हणतात, साहेबांचे खाते हे अत्यंत जबाबदारीचे आणि धकाधकीचे आहे, त्यांच्या हेक्टिक वेळेतून बाहेर निघणे, आणि साहेबाना सर्व प्रकारे आधार देताना तारेवरची कसरत होते.  घरचा आधारस्तंभ डळमळू न देता हा छंद जोपासणे  हे सर्वात अवघड आहे.  
दोन गोंडस लेकींवर संस्कार करीत असताना मी घराची जबाबदारीही समर्थपणे सांभाळत आहेत. माझ्या छंदासोबतच मुलींचे छंद,अभ्यास, खेळ याकडेही मी जातीने लक्ष देते. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिका-याची गृहकर्तव्यदक्ष पत्नी म्हणून घरात प्रसन्न वातावरण निर्माण करणे हे माझे कर्तव्य आहे असे   गितांजलीताई अभिमानाने सांगतात.

मुलांना श्वास घेण्यासाठी फुफ्फुस ठेवत नाही आहोत
आपण आपल्या भावी पिसाठी काय सोडून जाणार आहोत, आज आपण निसर्गाचा ऱ्हास करीत आहोत. झाडे तोडून आपण आपल्या मुलांना श्वास घेण्यासाठी फुफ्फुस ठेवत नाही आहोत. निसर्गाचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आणि बांधिलकी आहे..

गुलाब, कुंदा, झेंडू, रातराणी, जाई-जुई, सावली, अनेक प्रकारची शेवंती, निशिगंध, मोगरा, कृष्णकमळ, जास्वंद, मॉर्निग ग्लोरी, मंगोलिया, लिली, मनीप्लांट, डेलिया, जरबेरा, गार्डेनिया, अडीनियम,अलामंडा, अँग्लोनिमा, अरेकापाम, स्नेक प्लांट, सिंगोनियम, क्रोटोनचे प्रकार, ड्रेसेना रेफ्लेसा, पोथोज, नियोन पोथोज, डायथन्स,एक्झोरा, कॅलेथिया, मोनस्टेरा, फॉक्स टेल, टर्टल वाईन अशी हँगिंग प्लांट, हिवाळ्यात फुलणारे सर्व प्रकारचे पिटूनिया प्लांट तसेच  सॉंग ऑफ इंडिया, स्पायडर प्लांट, टँगल हार्ट, वांडेरिंग जिऊ, १५ ते १८ वर्ष जुने बोन्साय केलेले वड, पिंपळाचे झाड, याशिवाय आयुर्वेदिक वनस्पती आणि काळीमिरी, तेजपान, लवंगाचे झाडही गीतांजली भारती यांनी त्यांच्या बागेत लागले आहेत. 

जें रम्य तें बघुनियां मज वेड लागे;
गाणें मनांत मग होय सवेंचि जागें;
गातों म्हणून कवनीं फुलपांखरातें,
व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनातें.
... केशवसुत

गीतांजली ताईंच्या बागेतही असेच मन वेड होत... फुलांच्या दुनियेतून पाय निघत नाही... वेळेचे भान राहत नाही... आणि आपसूकच मन गुणगुणू लागते.... मला वेड लागले झाडांचे ....मला वेड लागले झाडांचे ....!!!

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links