बिबट्याच्या हल्ल्यात वगार ठार
* सोनमाळा येथील घटना
न्यूज कट्टा / लाखनी
घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वगारीवर बिबट्याने हल्ला चढविला. जंगलाच्या दिशेने ओढत नेऊन ठार केल्याची घटना सोनमाळा येथे २४ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता उघडकीस आली. रमेश पांडुरंग मुनेश्वर ,सोनमाळा असे नुकसान ग्रस्त पशुपालकाचे नाव असून त्यांचे ८ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अल्पभूधारक शेतकरी रमेश मुनेश्वर हे शेतीसह पशुपालनाचा व्यवसाय करतात. नेहमी प्रमाणे (दि.२४) त्यांचेकडे असलेली पाळीव जनावरे चारून आणली व रात्री गोठ्यात बांधले व जेवण करून झोपी गेले. सोनमाळा गावालगत वन विकास महामंडळाचे संरक्षित वनक्षेत्र असल्यामुळे तृणभक्षी प्राण्यासह हिंस्त्र प्राण्यांचा या जंगलात अधिवास आहे. रात्री शिकार किंवा पाणी पिण्याकरिता हे हिंस्त्रस्वापद गावात शिरकाव केला असावा. मूनेश्वर यांचे घर गावाशेजारी असल्याने बिबट्याने वगारीवर हल्ला करून ठार केले व ओढत जंगलाचे दिशेने घेऊन गेले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर ही बाब कुटुंबियाचे लक्षात आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी यांना घटनेची माहिती देण्यात आली.
क्षेत्र सहाय्यक डी. के. राऊत , वनरक्षक एस. एस. मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन मृत वगारीचा पंचनामा करून ८ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. ही बाब गावात पसरताच पशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'