BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

35 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


कोल्हापूर

कोल्हापूरात शिक्षकांना शाळेत कोंडले; आमदारांनी केली सुटका

कोल्हापूरात शिक्षकांना शाळेत कोंडले; आमदारांनी केली सुटका

संस्थाचालकाच्या अरेरावीविरोधात शिक्षक रस्त्यावर

 

न्यूज कट्टा / कोल्हापूर

कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरातील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या अरेरावीविरोधात शनिवारी शिक्षक रस्त्यावर उतरले. संस्थेच्या डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरातील शिक्षकांना संस्थापक जाधव यांच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ करण्याचे प्रकार होत असल्याच्या निषेधार्थ सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयावर धडक दिली.

शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या त्रासावरुन संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी चांगलेच धारेवर धरले.

या कालावधीतच संस्थाचालकांकडून माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वर्गात कोंडून प्रकार निदर्शनास आला. यामुळे गोंधळात आणखीन भर पडली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शाळेत जाऊन शिक्षकांची सुटका केली. तसेच याप्रकरणी संस्थाचालकांना खडेबोल सुनावले.

त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना “चुका दुरुस्त करा, चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही’असे बजावले. दोन तासहून अधिक वेळ गोंधळ सुरू होता. शिक्षक संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका, शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकवटलेल्या सगळया संघटना पाहून संस्थेचे अध्यक्ष जाधव काही सामोरे आले नाहीत.

दरम्यान संस्थेच्या उपाध्यक्ष व माजी मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांनी “माध्यमिक शिक्षकांना शाळेत कोंडले नव्हते. पोलिसांच्या सुचनेनुसार त्यांना शाळेच्या आवारातच थांबायला सांगितले होते. सगळेजण गेटच्या आतील बाजूला होते. शिवाय शाळेतील शिक्षकांकडून संस्थाचालकावर जे आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नाही.’ असे सांगितले गेले.

जयभारत शिक्षण संस्थेच्या श्रीधर सावंत विद्यामंदिरातील मुख्याध्यापक संजय पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी काही दिवसापूर्वी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. संस्थाचालक जाधव यांच्याकडून शाळेतील शिक्षकांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जाते.त्यांच्या वाढत्या अरेरावीविरोधात शिक्षकांनी पोलिसाकडेही तक्रार केली.

याप्रश्नी सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीचे पदाधिकारी शनिवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयावर मूकमोर्चा काढला. शाळेसमोर मोर्चा येताच माध्यमिक शाळेतील काही शिक्षकांना संस्थाचालकांनी ते शिक्षक आंदोलनात सहभागी होऊ नयेत म्हणून कोंडून ठेवल्याचे कृती समितीला समजले.

यावरुन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गैरवर्तणुकीविषयी प्रश्नांचा भडिमार केला. यावरुन वादावादी झाली. आमदार जयंत आसगावकर या ठिकाणी पोहचले. त्यांना, शिक्षकांना शाळेत कोंडून ठेवल्याचे सांगण्यात आले.आमदार आसगावकर यांनी तत्काळ शाळा आवारात जाऊन सगळया शिक्षकांना बाहेर काढले. यावेळी एक शिक्षिका रडत रडत बाहेर पडली.

आदर्श शिक्षक पुरस्कार काढून घ्या
शाळेच्या प्रांगणात चुकीचे कामकाज सुरू असल्यामुळे संस्थेच्या उपाध्यक्ष व माजी मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांना सरकारकडून मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार परत का घेऊ नये अशी विचारणा कृती समितीने केली.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links