BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

54224 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

तरुण डॉक्टरची किमया... टेरेसवर फुलविली हायड्रोपोनिक्स शेती 

तरुण डॉक्टरची किमया... टेरेसवर फुलविली हायड्रोपोनिक्स शेती 

डॉ. पंकज चिरवतकर यांचा विदर्भातील पहिलाच उपक्रम 

हायड्रोपोनिक्स पद्धतीने सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन 


न्यूज कट्टा / कविता मोरे / नागापुरे

शेती क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग सुरु असतात. विशेषत: जिथे शेतजमिनीची कमतरता असते, तिथे शेतीसाठी विविध पर्याय अवलंबले जातात. शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या हायड्रोपोनिक्स शेती या नव्या तंत्रज्ञानाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 

माती, शेतजमीन किंवा भरपूर पाणी या शिवायही शेती करता येते, नव्हे भरघोस उत्त्पन्नही घेता येते. ऐकून नवल वाटत असेल ना, पण हो, भंडाऱ्यातील एका तरुण डॉक्टरने हे सिध्द करून दाखविले आहे. घराच्या छतावर अगदी कमी जागेत, कमी पाण्यात हायड्रोपोनिक्स तंत्राने शेती करून पालेभाज्याचे उत्पादन घेण्यासाठी डॉ. पंकज चिरवतकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या कुटुंबाच्या गरजेपुरता मिरची, टोमॅटो, पालक, वांगी, बील पेपर (लाल व पिवळी शिमला मिरची )आदी पालेभाज्यांचे रसायनविरहीत उत्पादन घेण्यात यांना यश देखील आले आहे. या पायलट प्रोजेक्टला ५ एकरात करण्याचा मानस असणाऱ्या डॉ. पंकज चिरवतकर यांच्याशी खास बातचीत...

विदर्भातील पहिला उपक्रम 
भंडारा शहरात ट्रेझरी कॉलोनीमध्ये राहणारे डॉ. पंकज चिरवतकर हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. वडिलोपार्जित शेती असली तरी शेती हा त्यांचा फारसा जिव्हाळ्याचा विषय नव्हता. मात्र काही महिन्यापुर्वी त्यांना हायड्रोपोनिक्स शेती बद्दल कळले आणि या नव्या तंत्रज्ञानाप्रती त्यांची उत्सुकता वाढली. त्यातूनच त्यांनी हायड्रोपोनिक्स शेती करण्याचा निर्णय घेतला. विदर्भात अशाप्रकारचा उपक्रम करणारे डॉ. पंकज चिरवतकर हे पहिलेच व्यक्ती आहेत. 

...हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विना शेती 
हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक्स म्हणजे कार्यरत.. पाण्यावर कार्यरत असलेले शेती.  झाड किवा पिके जगवायला मातीची आवश्यकता नसून त्याला घटकांची आवश्यकता असते. ते घटक झाडाला दुसऱ्या माध्यमातून जरी मिळाले. तरी झाड जगतात आणि त्याला फळ, फुल सुद्धा येतात.

१०० चौ. फुटामध्ये १०८ भाजीपाल्यांची रोपे
डॉ. पंकज यांनी दोन महिन्यांपूर्वी एक online हायड्रोपोनिक्स मास्टर क्लास केला. त्यानंतर घराच्या छतावर १०० चौ. फुटामध्ये ग्रीन नेट हाऊस तयार केले. अहमदाबाद येथून एक हायड्रोपोनिक्स सेटअप मागविला. त्या हायड्रोपोनिक्स किटला त्यांनी त्यांच्या पद्धतीने नाविन्यपूर्ण केले. एवढेच नाही तर त्या सेटअपवरून त्यांचा  मित्र संजय धकाते यांच्या सहाय्याने एक नवीन सेट अप तयार केला. मल्टीलेयर फ्रेमच्या मदतीने पाईप्समध्ये १०८ भाजीपाल्यांची रोपे लावली. पाण्यातूनच या रोपाना पोषक द्रवे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ए्गझोटिक भाजीपाला घेण्याला ते प्राधान्य देतात. बटर हेड लेटीव्ह्ज, बिल पेपर, लोनोरोसोचे पिक घेण्यावर त्यांचा भर आहे. 

पाण्याचीही भरपूर बचत
वेळोवेळी पाणी घालण्यासाठी विशिष्ट पद्धतीची ड्रॉप इरिगेशन सिस्टीम लावण्यात आली आहे,  जी या रोपांना विशिष्ट अंतराने पाणी देते.  ही सिंचन व्यवस्था त्यांनी एक विद्युत timer लावून  नियंत्रित केली आहे. २०० लिटर पाणी महिनाभर चालते. मात्र एवढच पीक शेतजमिनीवर घेण्यासाठी जवळपास ५ ते ८ हजार लिटर पाणी लागले असते. यामुळे पाण्याचीही भरपूर बचत होते असे डॉ. पंकज चिरवतकर सांगतात.

ही शेती पद्धती जास्त प्रभावकारी
डॉ. पंकज चिरवतकर म्हणतात, शहरातील वाढती लोकसंख्या आणि शेतजमिनीची कमतरता यावर ही शेती पद्धती जास्त प्रभावकारी ठरू शकते.  विशेष म्हणजे या शेतीसाठी तुमच्याकडे जमीन असलीच पाहिजे अशी अट नाही. सध्या सगळीकडेच शेतजमिनींची कमतरता जाणवत आहे. दाट लोकसंख्येच्या शहरात जिथे शेत जमीन खूप दूर असते किंवा कमी असते अशा ठिकाणी या पद्धतीने शेती केल्यास फायदा होऊ शकतो.

या पद्धतीच्या शेतीतून अनेक फायदे
आजकाल, ‘टेरेस फार्मिंग’ हा एक नवीन ट्रेंड सुरु आहे. या तंत्रामध्ये मातीचा वापर न करता वनस्पतींसाठी आवश्यक असलेले पोषकद्रव्य पाण्याच्या मदतीने थेट वनस्पतीच्या मुळांमध्ये पोचविले जाते. याला हायड्रोपोनिक्स तंत्र म्हणतात.  या पद्धतीच्या शेतीतून अनेक फायदे असल्याचे डॉ. चिरवतकर सांगतात. हानिकारक रसायन फवारून घेतलेली पिके आरोग्यासाठी किती हानिकारक ठरत आहेत हे तर आजच्या काळात आपण सर्वच जण अनुभवत आहोत. अशावेळी खतांचा अधिक वापर न करता घेतलेल्या या पिकांमुळे रासायनिक द्रव्यांच्या घातक परिणामांपासूनही मुक्ती मिळते. याशिवाय या शेतीमुळे पर्यावरणाच्या समस्यांचे प्रमाणही कमी होईल. या तंत्रज्ञानात पाणी व  विजेची बचत होवून जमिनीचे रसायनीकरण अशा कितीतरी समस्यांपासून सुटका होऊ शकत असल्याचे डॉ. चिरवतकर सांगतात. 

खर्च थोडा जास्त
या तंत्राची एकमेव नकारात्मक बाजू म्हणजे सुरुवातीला या तंत्रात वापरली जाणारी ड्रॉप ईरीगेशन सिस्टम बसवण्यासाठी येणारा खर्च थोडा जास्त आहे. मात्र एकदा खर्च केल्यानंतर पुन्हा खर्च येत नाही त्यामुळे या तंत्राचा वापर करून शेती करणे निश्चितच फायद्याचे असल्याचेही ते म्हणतात. 

स्वतःच्या थोड्या जागेत ही शेती करायला हवी  
रासायनिक खतांचा मारा केल्याने विषारी झालेल्या पालेभाज्यापेक्षा अशा पद्धतीने बिनविषारी पालेभाज्या पिकवून खाव्यात.  जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास अन्नधान्याचे मुबलक उत्पादन मिळू शकते, खास करू महिलांनी यात पुढाकार घ्यायला हवा असे मतही डॉ. पंकज  यांनी व्यक्त केले. 

भविष्यात ही पद्धत काळाची गरज
हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये मातीचा वापर केला जात नाही. या तंत्रात मातीशिवायच रोपांची लागवड केली जाते. एका रासायनिक द्रावणात रोपांची उगवण केली जाते. भविष्यात ही पद्धत काळाची गरज होणार आहे. वाढती लोकसंख्या, रासायनिकरणामुळे दूषित झालेली जमीन तसेच पाणी टंचाई या सर्वांवर हे तंत्र रामबाण ठरणार असल्याचा ठाम विश्वास डॉ. पंकज यांनी बोलून दाखविला. 


टेरेस  फक्त पतंग उडवायला व कपडे वाळवायला नसून त्याचाआपण असा पण फायदा घेऊ शकतो असेही डॉ. पंकज गंमतीशीरपणे सांगतात. 
आजच्या काळात संपूर्ण लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य पुरवठा करणे ही नेहमीच एक आव्हानात्मक समस्या राहिली आहे. ग्रामीण भागात शेती योग्य जमीन भरपूर असते. पण, शहरात शेतीची कमतरता असल्याने अशा पद्धतीची शेती शहरी लोकांसाठी फायद्याची ठरू शकते.  

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links