BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1342 Views

By नदीम खान


भंडारा

शौऱ्याला सलाम : सात चिमूकल्या बाळांचे प्राण वाचविणारे ते मसीहा

शौऱ्याला सलाम : सात चिमूकल्या बाळांचे प्राण वाचविणारे ते मसीहा 
भंडारा अग्निकांडातील प्राण वाचविणाऱ्यांचे आय विटनेस अकाऊंट

 

नदीम खान 

न्यूज कट्टा / भंडारा 

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीने 10 नवजात बाळांचा जीव घेतला. स्थानिक अॅम्ब्युलेन्स चालक युवकांनी जर आपला जीव मुठीत घालून रुग्णालयात प्रवेश केला नसता तर परिस्थिति आणखीन जास्तच चिघळली असती.

नवजात अति दक्षता (SNCU- Severe Neonatal Care Unit) कक्षाने रात्री साडेबारा च्या दरम्यान पेट घेतला असेल. कक्षातून धूर येताना पाहून ड्यूटिवर असलेले रक्षक गौरव रहपाडे आणि शिवम मडावी यांनी राहुल गुप्ता, राजकुमार दहेकर या अॅम्ब्युलेन्स चालकांना मदतीसाठी फोन केला त्यावेळी दीड वाजून गेलेले होते. तात्काळ चारही युवक पहिल्या माळ्यावर असलेल्या अति दक्षता कक्षात पोहोचले.

न्यूज कट्टा सोबत बोलतांना राहुल गुप्ता या युवकानी घटनेचे वर्णन केले “दार उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता कक्षात सगळीकडे धूर होता. आग आणि काळ्या धूराशिवाय काहीही दिसत नव्हते. ऑक्सिजन सिलिंडर असलेल्या भागात आग वाढलेली दिसत होती. स्फोट होत असल्याचा आवाज, उडत असलेले काचाचे तुकडे व जमिनीवरील फुटलेल्या टाईल्सने कक्षाच्या आत जाता येत नव्हतं. रुग्णालय स्टाफ, ब्रदर्स आणि सिस्टर्स च्या मदतीने आत जाण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले. इतक्यात अग्निशमन दल तिथं पोहोचले. सगळे इमारतीच्या बाहेर आले व अग्निशमन दलाच्या पायऱ्यांचा वापर करून इमारतीच्या मागच्या भागात असलेल्या दाराला पायऱ्या टेकवून आत प्रवेश केला. आत जाण्यासाठी कक्षाचे मागचे दार फोडावे लागले.” 

सोबत असलेल्या राजकुमार दहेकर ‘प्रिन्स’ नी सांगितले की “कक्षात इन बोर्न (In Born) म्हणजेच सामान्य रुग्णालयात जन्म झालेले एका बाजूला तर आउट बोर्न (Out Born) म्हणजेच जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आलेले नवजात बाळ ठेवलेले होते. इन बोर्न कक्षात असलेल्या सर्व सातही बाळांना बाहेर काढले पण आउट बोर्न मधील बाळांच्या भागात ठेवलेल्या उपकरणांनी पेट घेतलेला होता. त्या भागात आगीमुळे जाता आले नाही. त्यात दोन बाळांनी सुद्धा पेट घेतलेला होता.”

राहुल पुढे म्हणाले की “धूर इतका तीव्र होता की आम्हाला सुद्धा सहन होत नव्हते. आमच्याकडे आग विझवण्याचे साधन असते तर कदाचित आम्ही कक्षातील आग आटोक्यात आणली असती. आम्हाला सर्वात आधी ड्यूटिवर असलेले रक्षक गौरव रहपाडे आणि शिवम मडावी यांनी फोन करून मदतीला बोलविले म्हणून आम्ही धावून गेलो.”

वीज निरीक्षक अधिकारी आणि फायर कॉलेजचे तज्ञ मंडळी घटना स्थळी पोहोचून आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार वातानुकूलित यंत्राजवळ ठेवलेल्या बाळाच्या यंत्रात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.

सात चिमुकल्या बाळांचे प्राण वाचविणारे हे सर्व मसीहा चोवीस तास सामान्य रुग्णालय परिसरात वावरतात. यांच्या अॅम्ब्युलेन्स गाड्या रोज भंडाऱ्यावरुन नागपूर मेडिकल कॉलेजला रुग्णांना हलवितात. सलाम त्यांच्या शौऱ्याला!

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links