BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

229 Views

By कविता मोरे/ नागापूरे


भंडारा

‘त्या’ दहा बाळंतिणींची काळजी अपरिहार्यच, पण रोज मरणाऱ्या बाळंतिणींचे काय ? 

‘त्या’ दहा बाळंतिणींची काळजी अपरिहार्यच, पण रोज मरणाऱ्या बाळंतिणींचे काय ? 

न्यूज कट्टा / कविता मोरे नागापुरे 


बाळंतपण हा बाईचा दुसरा जन्मच ! बाळंतपणानंतर माता आणि नवजात बाळाला डोळ्यात तेल घालून  जपावे लागते. मात्र  जिल्हा रुग्णालयाला या गोष्टीचे गांभीर्य कधी कळलेच नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शनिवारची दुर्घटना. दुर्घटना तरी कसे म्हणावे ? कारण ‘त्यांचा’ मृत्यू नैसर्गिक नव्हताच, त्या कोवळ्या जीवांची ती हत्याच आहे. या अग्निकांडात काळजाच्या तुकड्याला गमावलेल्या ओल्या बाळंतिणींची काय अवस्था झाली असेल? किती आघात झाले असतील त्यांच्या शरीरावर आणि मनावर. प्रसुतकळापेक्षा या वेदना आता असह्य होत आहेत. धाय मोकलून रडावं वाटत असताना प्रसूत होण्याच्या भीतीने तेही करता येत नाहीये. आता या बाळंतिणींना खरी गरज आहे ती आधाराची, समुपदेशनाची.... 


या बाळंतिणींची काळजी घेणे ही माझी आद्य जबाबदारी असल्याची संवेदना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल बोलून दाखविली. ‘त्या’ दहा बाळंतिणींची काळजी घेणे अपरिहार्यच आहेच पण भंडारा जिल्हा रुग्णालयात दररोज मरणयातना भोगणाऱ्या बाळंतिणींचे काय ? त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? या बाळंतिणींसाठी यापुढे जिल्हा रुग्णालयात काय नियोजन करणार?


जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश माहिला व बाल कल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो यांनी भंडारा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर मातांची अंगणवाडी सेविका, आशा व एएनएम यांच्याकडून नियमित आरोग्य तपासणी करुन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले. मृत बालकांच्या मातांचे नियमित समुपदेशन करुन त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. मातांची घरपोच आरोग्य तपासणी डॉक्टरांनी करावी व दैनंदिन अहवाल आशामार्फत कळवावा अशा सूचनाही देव्यात आल्या. महिला व बालकल्याण मंत्र्यांची ही धडपड आणि संवेदनशीलता कौतुकास्पद आहे, पण सामान्य रुग्णालयातील प्रत्येक बाळंतिणींलाच अशी आरोग्यसेवा पुरविणे गरजेचे नाही का ? या ठिकाणी दररोज होणारी बाळंतिणींची उपेक्षा, त्यांच्या मातृत्त्वाचा केला जाणारा अपमान हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोषक नाहीच. 


शासनाच्या जननी सुरक्षा योजनेमुळे घरी होणारी असुरक्षित बाळंतपण आता जिल्हा रुग्णालयात केली जाऊ लागली आहेत. मात्र भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाची दूरवस्था आणि शनिवारचे अग्निकांड यामुळे पुढील काही वर्षात सर्वसामान्य लोक परत घरीच दाईनीच्या हातानेच बाळंतपण करण्यास प्रवृत्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, अधिकारी यांचा हलगर्जीपणा आणि कमालीची निर्ढावलेली प्रवृत्ती यामुळे सर्वसामान्यांचा जिल्हा रुग्णालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे. बाळंतिणींसोबत अरेरावी आणि मनमानी वागणे म्हणजे मातृत्वाचा अपमानच आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाची ही बेपर्वाही खरोखरच गुन्हेगारी स्वरूपाची आहे...

नवजात बाळ आणि बाळंतिणीला सुरुवातीच्या काळात संसर्गाचा धोका अधिक असतो असे असताना नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या आणि बाळंतिणीच्या आरोग्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयाला कायमच रेल्वेस्थानकाचे रूप असते. प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीपश्चात प्रभागांमध्ये रेल्वेस्थानकाप्रमाणेच चहावाले, कापड विक्रेते यांची रेलचेल असते. थेट बाळंतिण बाईच्या जवळ जाऊन मालविक्री करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली आहे. रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांची वर्दळ असते. या फेरीवाल्यांकडे झबली, टोपरी, मेणकापड, मच्छरदाणी, लागणारे सर्व साहित्य विकायला असते. हे सर्व साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. हे विक्रेते थेट बाळंतिणीच्या जवळ जाऊन राजरोसपणे विक्री करताना दिसतात.

जिल्हा रुग्णालयात येणारा रुग्ण हा मजूर, गरजू किंवा सर्वसामान्य नागरिक असतो. पैशांची चणचण त्याला सामान्य रुग्णालयात येण्यास भाग पाडते. मात्र शंभर रुपये रोजी कमावणाऱ्या गरीब, अशिक्षित रुग्णांच्या  मानेवर तलवार ठेवून त्यांना त्रास देण्याचे काम येथे केले जाते. काही परिचारिकांना सरकारी पगारात भागत नसल्यामुळे की काय त्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून भीक मागण्याची सवय झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक मात्र अजूनही गांधारीच्या भूमिकेत आहेत. त्यामुळेच बाळ जन्माला आल्यापासून त्याच्या नातलगांना लुटण्याचा धंदा राजरोसपणे चाललेला आहे. 
प्रसुती विभाग हे इथल्या काही परिचारिकांसाठी दादागिरी करून पैसा कमावण्याचा अड्डाच बनला आहे. बाळाला नातलगांच्या हवाली करण्यासाठी २००  ते ४०० रुपये, नाळ कापण्यासाठी १०० ते २०० रुपये, स्ट्रेचरवरून हलविण्याचे ५० ते १०० रुपये, सकाळ-संध्याकाळ ड्रेसिंग करण्याचे ३० ते ५० रुपये अशी वसुली चाललेली असते.

नडलेल्याना अडवून त्यांची पिळवणूक करताना या सेवेच्या व्रताचा त्यांना विसर पडलेला आहे. काही परिचारिका, काही कर्मचारी एवढेच नव्हे तर सफाई कामगार सुद्धा बाळंतीण आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोलताना गलिच्छ भाषेचा वापर करतात. बाळंतिणीला किंवा नातेवाईकांना कामे सांगितली जातात आणि त्यांचे न ऐकल्यास त्यांना सर्वतोपरी त्रास दिला जातो काही परिचारिकांची तर निव्वळ दादागिरी चाललेली असते. 

अशा अनेक समस्यांना तोंड देत बाळंतिणीला येथे दिवस काढावे लागतात. या सर्वांचा परिणाम तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. माहिला व बाल कल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या दहा मातांप्रमानेच जर रुग्णालयातील सर्व बाळंतिणीच्या आरोग्यासाठी नियोजन केले तर शनिवारच्या त्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही...

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links