अलर्ट : बर्ड फ्ल्यू विदर्भात दाखल
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर भागात 24 पक्षी मृत आढळले
न्यूज कट्टा / भंडारा
महाराष्ट्रातील मराठवाडा व कोंकण पाठोपाठ बर्ड फ्ल्यू आता विदर्भात दाखल झाल्याचे वृत्त आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तहसील अंतर्गत पालांदूर भागातील एका फार्ममध्ये 300 पक्ष्यांपैकी 24 पक्षी (कोंबड्या) आज दि. 12 ला मृत आढळले आहेत.
संदीप कदम, भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ति व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष यांनी तहसीलदार लाखनी यांना बर्ड फ्ल्यू च्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत अति तात्काळ पत्र निर्गमित केले आहे. सदर फार्म धनंजय डोलिराम भुसारी यांचे आहे.
मृत पक्ष्यांची बर्ड फ्ल्यू निदान होणे करिता जिल्हा पशुवैद्यकीय प्रयोगशाळा भंडारा कडून प्रादेशिक रोग अन्वेषण प्रयोगशाळा नागपूर तर्फे पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळा, औंध येथे पाठविण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आताच प्राप्त होणार नसला तरीही संसर्ग व संभाव्य रोगराईचे प्रादुर्भाव रोखथाम करण्याकरिता भुसारी यांच्या फार्म वर पुढील अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. डोलिराम भुसारी व त्यांचे संपर्कतील सर्व नातेवाईक व नागरिकांना 14 दिवसांकरिता होम क्वारांटाईन करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
सोबतच पालांदूर गावाला कंटेनमेंट करून सर्व प्रकारचे आवागमन बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, साकोली यांना देण्यात आले आहेत. मृत पक्ष्यांमुळे संसर्ग प्रसारित होऊ नये म्हणून मृत पक्ष्यांना जमिनीत गाडण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानं राज्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याशिवाय मुंबईत 3 कावळे, ठाण्यात 15 बगळे, दापोली (कोकण) 6 कावळे, बीडमध्ये 11 कावळे मृतावस्थेत सापडलेत.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'