BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1124 Views

By कविता मोरे/ नागापूरे


भंडारा

अग्निकांडानंतर रुग्णालयात जन्मलेल्या ६४ बाळांकडे कुणाचे लक्ष ? वाचा , सामान्य रुग्णालयाची "असामान्य " गोष्ट 

अग्निकांडानंतर रुग्णालयात जन्मलेल्या ६४ बाळांकडे कुणाचे लक्ष ?

वाचा , सामान्य रुग्णालयाची "असामान्य " गोष्ट 
 

न्यूज कट्टा / कविता मोरे नागापूरे 
 

शनिवार ९ जानेवारी रोजी झालेल्या अग्निकांडात नवजात अति दक्षता कक्षातील 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला. वाचविण्यात आलेल्या ७ बाळांवर (सध्या वातावरण तापलेले  असल्यामुळे) उत्तमप्रकारे उपचार सुरु आहेत. मात्र या ५ दिवसात एका गोष्टीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. ९ पासून १३ जानेवारीपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्माला आलेल्या ६४ बाळांकडे कुणाचे लक्ष आहे?  जन्माला आलेल्या ६५ बाळांपैकी एकाला नागपूर येथे हलविण्यात आले असून बाकी ६४ बाळ त्यांच्या आईजवळ सामान्य रुग्णालयातच आहेत. विशेष म्हणजे या ६४ बाळांपैकी कुणालाही SNCU मध्ये हलविण्याची परिस्थिती नसल्याचे सांगण्यात आले, घटनेपूर्वी या रुग्णालयात दररोज अनेक बाळांना SNCU मध्ये हलविण्यात येत होते. मात्र आता सर्वच बाळ 'हेल्दी' आहेत ही सुद्धा या सामान्य रुग्णालयाची एक ‘असामान्य’ गोष्ट आहे. 


शनिवारी मध्यरात्री अग्निकांड झाले असले तरी सकाळी ९ वाजतानंतर दिवसभरात प्रसूतीसाठी ८ गर्भवतींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात आकस्मिक विभागात (वार्ड क्रमांक ८) १ मुलगा व २ मुली तर इलेक्टीव्ह विभागात (वार्ड क्रमांक ६ व ७) १ मुलगा व ४ मुली जन्माला आल्या. १० जानेवारी रोजी आकस्मिक विभागात ४ मुल व १२ मुली जन्माला आल्या त्यापैकी एका मुलीचे वजन १.५ किलो असल्याने तिला नागपूरला रेफर करण्यात आले. ११ जानेवारी रोजी आकस्मिक विभागात ६ मुल व ८ मुली तर इलेक्टीव्ह विभागात एका मुलीचा जन्म झाला. १२ जानेवारी रोजी आकस्मिक विभागात जन्माला आलेल्या मुलांची संख्या २ तर मुली ५ आहेत. इलेक्टीव्ह विभागात ३ मुल तर १ मुलगी जन्माला आली. १३ जानेवारी दुपारी ३ वाजतापर्यंत आकस्मिक विभागात ३ मुल, ५ मुली व इलेक्टीव्ह विभागात १ मुलगा व २ मुलींच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. वाचविण्यात आलेल्या ७ बाळांना तात्पुरता SNCU कुटुंब कल्याण विभागाच्या कक्षात ठेवण्यात आलेले आहे. 


सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची घडी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, , जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक शल्यचिकित्सक, कर्मचारी चौकशी समितीद्वारे बयान नोंदविणे, दररोज येणाऱ्या मंत्र्या-संत्र्यांना उत्तरे देणे अशा अनेक गोष्टींमुळे व्यस्त आहेत. त्यामुळे घटनेनंतर ५ दिवसात रुग्णालयात आलेल्या माता आणि नवजात शिशुंकडे कुणाचे लक्ष आहे? काही मोजक्या परिचारिका आणि वैदकीय अधिकारी या विभागांमध्ये कर्तव्य बजावत आहेत. घटनेपूर्वी या रुग्णालयात दररोज अनेक बाळांना SNCU मध्ये हलविण्यात येत होते. मात्र आता या ठिकाणी असलेल्या ६४ बाळांना SNCU मध्ये हलविण्याची परिस्थिती  नसल्याचे सांगण्यात आले. ही सुद्धा सामान्य रुग्णालयाची एक ‘असामान्य’ गोष्ट आहे. 


या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्याशिवाय SNCU विभाग पूर्वपदावर येणार नाही. अर्थात तोवर कुठल्याही बाळाला SNCU मध्ये ठेवता येणार नाही. ३ दिवसात चौकशी समितीला अहवाल सदर करायचा होता मात्र आता हे काम रविवारपर्यंत लांबणीवर गेले आहे. त्यामुळे आता या आठवड्यात कितीही निकडीचा प्रसंग आला तरीही रुग्णालयात तशी सोय नाहीच. त्यामुळे आता या ६४ बाळांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. 


घटनेच्या दिवशीही ३४ नवजात बाळ आणि माता वार्ड क्र. ६ आणि ७ मध्ये भरती होते. SNCU चे एक दार या वार्डात उघडत असल्याने धूर या वार्डातही पसरत गेला. येथील माताना व बाळांना ताबडतोब हलविण्यात आले त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. मात्र आज ५ दिवस लोटूनही या वार्डात भयाण शांतता आहे. वार्डातील सर्व बेड ओसाड पडले आहेत. नेहमीच गजबजलेले हे वार्ड नव्हे रुग्णालायचं आता भकास वाटू लागले आहे. या वार्डातील मातांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती बरच काही बोलून जात आहे. त्यांच्या डोळ्यात अजूनही बाळाच्या सुरक्षेबद्दल भिती स्पष्ट दिसत आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links