BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

291 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

EXCLUSIVE भंडारा अग्निकांड चौकशी अहवाल: सत्यता पडताळणी की सावरासावर?

EXCLUSIVE

भंडारा अग्निकांड चौकशी अहवाल: सत्यता पडताळणी की सावरासावर?

 

न्यूज कट्टा विशेष

भंडारा अग्निकांडाचा चौकशी अहवाल 3 दिवसांत सादर करायचा असताना तब्बल 10 दिवसानंतर हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार समितीने मोजक्याच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले असल्याची माहिती विश्वासू सूत्रांकडून हाती आली आहे. अहवाल अद्याप गुलदस्त्यात असून सूत्राने दिलेली माहिती सत्य असल्यास समितीने चौकशीच्या नावावर एवढे दिवस केलेला विलंब हा सत्य पडताळणीसाठी नसून सारवासावर करण्यासाठी तर नव्हता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

9 जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अति दक्षता कक्षाला आग लागून 10 निष्पाप जीवांचा बळी गेला. या अग्निकांडाची उच्च स्तरीय चौकशी 3 दिवसांत पूर्ण करून दोषींवर कारवाई करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भंडारा भेटीदरम्यान दिले होते. चौकशी समितीची सूत्रे आरोग्य विभाग संचालक डॉ. साधना तायडे यांच्या हाती दिल्या कारणावरून गदारोळ झाल्यानंतर आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या पर्यवेक्षणात समिति कार्य करेल असे आदेश काढले होते.

चौकशी समितीला त्यांच्या विनंतीवरून रविवार दि. 17 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान मंगळवार दि. 19 जानेवारीला चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. साधना तायडे यांनी आरोग्य विभाग सचिव डॉ. व्यास यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. दोन दिवस लोटूनही अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. चौकशी समितीच्या काही सदस्यांची अहवालाच्या प्रतीवर स्वाक्षरी झाली नसल्याने अहवाल प्रसिद्ध करण्यास उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान अहवालात कुणावर व किती लोकांवर कार्यवाई करण्यात येत आहे याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमात फिरत आहेत. नाव उघड न करण्याच्या अटीवर नागपूर येथील एका सूत्राने न्यूज कट्टाशी बोलताना सांगितले की, अहवालात दोन परिचारिकांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती ग्राह्य धरल्यास या भीषण अग्निकांडात केवळ दोनच परिचारिकांना दोषी धरून इतर दोषी कर्मचारी, डॉक्टर्सना, शल्य चिकित्सक व इतर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार तर सुरू नाही?

अहवालाबाबत जिल्ह्यातील कुणीही बडे अधिकारी बोलायला तयार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर अग्निकांडाची माहिती सोडून इतर विषयावरसुद्धा कुणीही माहिती द्यायला तयार नाही. अहवाल कधी प्रसिद्ध होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links