BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

187 Views

By कविता मोरे/ नागापूरे


भंडारा 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली : आरोग्य अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली : आरोग्य अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
न्यूज कट्टा / कविता मोरे नागापुरे 

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या स्पर्धेचा निकाल लावण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिलेले असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके निकाल लावण्याकरिता टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असून कोणतेही कारण नसताना निकाल लावण्यासाठी विलंब करणे ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्लीच आहे. 

"दोन महिने लोटूनही  निकालाचा मुहूर्त निघेना !
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' स्पर्धा नावापुरतीच का ?" या मथळ्याखाली १७ डिसेंबर रोजी न्यूज कट्टाने  बातमी प्रकाशित केली होती. ( वाचा बातमी http://www.newskatta.in/article/109 ) त्यानंतर निकाल कधी लागणार याचा पाठपुरावा न्यूज कट्टाने सातत्याने केला. मात्र कधी तांत्रिक अडचण तर कधी हेल्थ इशू , कधी सामान्य रुग्णालय अग्निकांडाचा बहाणा तर कधी आज उद्या असे करीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऊईके हे निकाल जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी उपक्रम घेण्यात आले. या अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा स्तरावर 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत विविध स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये निबंध, पोस्टर्स, घोषवाक्य आणि लघुपट या स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील 362 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला. 21 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले होते. दोन दिवसांत निकाल जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्त करण्यात आला. शिवाय त्यासाठी लागणारा निधीही जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे.

निकाल जाहीर न करण्याचे कोणतेही कारण नसताना जिल्हा आरोग्य विभागाने निकालाला केराची टोपली दाखविली होती. या बाबत काही स्पर्धकांनी न्यूज कट्टाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून निकलाबाबत जिल्हा प्रशासनाला जाब विचारावा अशी विनंती केली. त्यानंतर हा विषय न्यूज कट्टाने लावून धरला. मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदाही समाधानकारक उत्तर न देता नानाविध कारणे सांगून टाळाटाळ केली. याउलट आज न्यूज कट्टाशी बोलतांना जिल्हा आरोग्य अधिकारी उइके यांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांचे नाव पुढे करून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “उद्या निकाल जिल्हाधिकारी जाहीर करतील. निकाल आज किंवा उद्या लावण्यात येईल. तुम्ही वारंवार फोन करून मला त्रास देऊन नका.” 

या स्पर्धांमध्ये हजारो रुपयांची बक्षिसे शासनाने जाहीर केली होती. जिल्हा प्रशासनाच्या या कायमच उदासीन धोरणामुळे आता स्पर्धकांचा चांगलाच हिरमोड झालेला आहे. जिल्हाधिकार्यांचे आदेश असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे निकाल लावण्या बाबत उदासीनता दाखवणे म्हणजे पाणी कुठंतरी मुरत असल्याचे लक्षण आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links