कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे म्हणजे तोंडाला पाने पुसणे : मदनकर
सीएस ला बडतर्फ करा; सदोष मानुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
न्यूज कट्टा / नदीम खान
संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागेलेल्या आगीत 9 जानेवारीला 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकारानंतर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली कारवाई म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी रोखठोक प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते व भाजप जिल्हा महासचिव विकास मदनकर यांनी दिली आहे.
विकास मदनकर यांनी 2018 व 2020 मध्ये माहितीच्या अधिकारात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे कोणतीही आग प्रतिबंधात्मक व्यवस्था उपलब्ध नाही हे सत्य उघड केले होते.
आज संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात केली. शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, इन-चार्ज वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची बदली करण्यात आली आहे.
“मुख्य म्हणजे बडतर्फ करण्यात आलेले बाल रोग तज्ञ डॉ. सुशील अंबादे हे कंत्राटी पद्धतीवर सामान्य रुग्णालयात काम करतात. रोज सकाळी 11 नंतर त्यांची सामान्य रुग्णालयातील सेवा समाप्त होतेच, मग त्यांच्या सेवा समाप्तीच्या निर्णयाला काही अर्थ नाही. असे अनेक डॉक्टर्स 11 महिन्यानंतर नव्याने कंत्राटिपद्धतीवर रुजू होऊ शकतात. तसेच बडतर्फ केलेल्या दोन परिचारिका सुद्धा कंत्राटी पद्धतीवर होत्या. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत अतिशय कमी मानधनावर काम करणाऱ्या या परिचारिका म्हणजे बळीचे बकरे ठरले आहेत,” असे मदनकर म्हणाले.
“निलंबित केलेले शल्य चिकित्सक सहा महीने अर्ध्या पगारात सुट्ट्या संपवून पुनः कुठेतरी रुजू होतील व हे असेच सुरू राहील. आपलेच दांत व आपलेच ओठ अशी स्थिति असलेल्या सरकारची कीव येते. आम्ही शल्य चिकित्सक यांना बडतर्फ करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहोत. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा” असे विकास मदनकर यांनी बोलून दाखविले.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'