'नूतनच्या कन्या' पूजा आणि ऋतुजा सुवर्ण पदकाच्या मानकरी
सुवर्णपदक मिळवून शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली
न्यूज कट्टा / भंडारा
शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मनोहरभाई पटेल स्मृति सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरलेले भंडारा जिल्ह्यातील दोनही गुणवंत स्थानिक नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून त्यांनी शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखलेली आहे.
इयत्ता बारावीत जिल्ह्यात चारही शाखांमधून प्रथम येणारी वाणिज्य शाखेची पूजा आश्विन मेहता आणि माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम येणारी ऋतुजा जागेश्वर वाघाये यांना राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्णपदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गोंदिया शिक्षण संस्था, मनोहरभाई पटेल स्मृति समिति, गुजराती राष्ट्रीय केळवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मनोहरभाई पटेल यांचा 115 वा जयंती कार्यक्रम मंगळवारी (दि. 9) गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते तर अनेक आमदार, नेतेमंडळी व शिक्षणतज्ञांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
पूजा आश्विन मेहता हिने 650 पैकी 628 गुण प्राप्त केले असून 96.22 टक्के घेतले आहे. अकाऊंट विषयात तिला 100 गुण असून, एसपी 99, ओसी 97, बँकिंग 190 व इंग्रजीत 92 गुण आहेत. ऋतुजा जागेश्वर वाघाये हिने 500 पैकी 500 गुण घेतले असून गणित 100, विज्ञान 99, संस्कृत 99, समाजशास्त्र 98 व इंग्रजी 96 गुण प्राप्त केले आहेत.
नूतन कन्या शाळा संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव बोनगिरवार, सचिव मुरलीधर भुरे, सहसचिव शेखर बोरसे, कार्यकारिणी सदस्य सौ. रेखा पनके, प्रमोद पनके, सौ. ज्योति गुर्जर यांनी गुणवंतांचे तसेच त्यांच्या शिक्षकांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्य सौ. सीमा चित्रीव, उपमुख्याध्यापिका जयश्री मेश्राम, पर्यवेक्षक सौ. निलू तिडके व सौ. सुरेखा डुंभरे यांनी पूजा व ऋतुजा चे अभिनंदन केले आहे.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'