BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1122 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


चंद्रपुर

  मोह एक कल्पवृक्ष !!! ये है मोह मोह के धागे.....

  मोह एक कल्पवृक्ष !!!

ये है मोह मोह के धागे.....

 न्यूज  कट्टा / डॉ.योगेश दुधपचारे, चंद्रपुर

मध्य भारतात किमान 50 जिल्ह्यांत आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली ‘मुटम्या देव’ किंवा मोठा देव मांडला जातो. मोहाच्या झाडाची मूळं, फांद्या आणि खोड इंधन म्हणून वापरला जातो, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मोठ्या लाकडाचे सुद्धा दोन उभे तुकडे होतात, जाळण्यासाठी मोहाच्या झाडाचा सगळ्यात जास्त होतो, हा लाकूड लवकरच फुटतो आणि लवकरच जळतो म्हणून इंधन म्हणून मोहाचा सगळ्यात जास्त वापर होतो. 
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाची शेती खूप आहे, या सर्व लोकांच्या घरी विशेषता शेतकरी, पाटलांच्या घरी बैलांना पाणी पिण्यासाठी मोहाच्या लाकडाच्या डोंग्या बनवले जातात, हीच स्थिती बालाघाट कडे पाहावयास मिळते. या लाकडाच्या पाट्या चांगल्या बनत असल्यामुळे टेबल-खुर्ची अशी साधने बनवण्यासाठी सुद्धा मोहाचा वापर होतो. मासेमारीसाठी लागणारा डोंगा मोहाच्या लाकडाचा असतो आणि सोनार मोहाच्या कोळशावर सोने, चांदी ठेवून नळीने फुंकर घालीत असतो, लोहार तर नांगर पाजवताना मोहाचेच कोळसे घेऊन या असे आवर्जून सांगतो.

मोहाची साल पाण्यात शिजवली जाते आणि एखाद्या मनुष्याच्या अंगात जर थंडी भरली असेल तर किंवा त्याचे अंग दुखत असेल तर अशा पाण्याने त्या मनुष्याची आंघोळ केली जाते, याचा त्वरित फायदा होत असतो.  गायी किंवा बैलांचे शरीर सुद्धा मोहाच्या सालीने शेकले जाते.
मोहाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोण बनवले जातात. गावागावांत जंगलातून मोहाची पाने गोळा करून उन्हाळ्याच्या दिवसात  लग्नकार्य व इतर समारंभात विकल्या जातात आदिवासींना या पत्रावळी पासून मोठा रोजगार मिळतो. गडचिरोली कडील पत्रावळी नागपुरात उमरेड नाका, रघुजी नगर चौक इत्यादी भागात अगदी कालपर्यंत विकल्या जात होत्या. अक्षयतृतीयाला मी तुकूम(चंद्रपुर-मी रहातो तो वार्ड) मध्ये मोहाच्या पत्रावळी गावातील बायांना विकताना पाहिल्या त्या पत्रावळीवर अन्न ठेवून आपल्या पूर्वजांना अर्पण केले जाते. मोहाचे स्थान निव्वळच आदिवासी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात त्यांच्या धर्म कार्यात, त्यांच्या लग्नकार्यात आणि सामाजिक जीवनात अत्यंत मोठे आहे. जंगलामध्ये इतरही झाडांची पाने आहेत परंतु सामान्यता मोहाच्या पानांनाच प्रीफर केले जाते. पोळा हा आपल्या सर्व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे पोळ्याच्या दिवशी फक्त मोहाच्या पत्रावळीत बैलाला जेवायला दिले जाते.

गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या भागांमध्ये भात पिकवला जातो त्या भागात धानाची रोवणी करताना मोहाच्या पानांचा बनवलेला मोर्या अंगावर घेतला जातो. बांबू आणि मोहाची पाने यापासून बनवलेला हा मोरया विशेषता पेरणी करताना, धानाच्या पेंड्या उपटताना, व धानाचे ट्रान्सप्लांटेशन करताना अत्यंत महत्त्वाचा आहे, याशिवाय रोवणीची कल्पनाच करता येत नाही. पेरणी करताना मोहाच्या मोरया वर कितीतरी गीत आजपर्यंत बाया म्हणतात आली आहेत….. एक गीत, “रोवना रोउ बाई, रोवना रोउ बाई… मोऱ्या कोटी ठेऊ…”

ज्या दिवशी रोहिणी संपते त्या दिवशी या मोऱ्याची पूजाही केली जाते, नंतर ते सुरक्षित ठेवले जातात आणि पुढील वर्षी त्यात पुन्हा सुधार करून त्यांचा वापर केला जातो. पावसाळ्यात मोरया एक तर गरम राहतो आणि शरीराला पाणी लागू देत नाही

मोहाचे अनंत गुण आणि कार्य असताना मोह फक्त दारू साठी बदनाम करण्यात आलेला आहे, मोहामुळे आदिवासीची सुद्धा बदनाम केली जाते, खरे तर ते आमच्या पेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत. मोहाची दारू पिऊन लोक गावात फिरत असतात, दारू शिवाय त्यांचे जीवनच चालत नाह.  जन्म होताना, लग्न होताना आणि मरताना सुद्धा दारू आदिवासींची सोबती आहे, त्याच गावात झामपर नसलेल्या स्त्रिया सुधा रस्त्याने जात असताना, अगदी जंगलात सुद्धा अशा फिरत असताना, आदिवासींच्या परिसरात एखादा बलात्कार झाला, कुणीतरी एखाद्या स्त्रीची छेड काढली असे कधीच पहावयास मिळत नाही.
बाळंतपणाच्या वेळी मोहाची दारू सुद्धा पाजली जात होती, तिने बळ येते व बाळांतीनचे शरीर गरम राहते.  लग्नात  नवरदेव आणि नवरी मोहाच्या पाटावर किंवा पिढ्या वर बसलेले असतील, लग्नात मोवई चे  खांब केंद्रस्थानी लावले जाते, या खांबावर सुंदर नक्काशी काढली जाते. 

मोहापासून फक्त दारूच मिळते असं नाही, मागील महिन्यात मी  अनेक गोष्टी पाहिल्या आणि खाल्ल्यात सुद्धा. माझे मित्र डॉक्टर कुंदन दुपारे आणि डॉक्टर विना जांबेवार यांनी तयार केलेले मोहाचे लाडू गुजरातच्या स्त्रियांनी विकत घेऊन नेले. बोराचे बोरकुट जसे असते तसे मोहाची सुद्धा लहान लहान बिस्किट्स तयार केले गेले, दाळीच्या पुरणपोळी पेक्षा मोहाची पुरणपोळी अतिशय स्वादिष्ट असते, डॉक्टर विना जंबेवार ह्या होम इकॉनॉमिक्स या विषयाच्या प्रमुख आहेत आणि त्यांची पीएचडी ' नॉन टीम्बर फॉरेस्ट प्रॉडक्ट' या विषयावर आहे. त्यांच्या संशोधनात त्यांनी असंख्य असे प्रोडक्स प्रोपोज्ड केले आहेत. शासनाने जर अशा संशोधकांना चालना दिली तर या संपूर्ण भागातील आदिवासींचे जीवन उंचावू शकते. काजू हे भारतातील फळ नाही ते पोर्तुगीजांनी बाहेरून गोव्याकडे आणलेले आहेत, परंतु मागील शंभर वर्षात काजू पासून बनवलेली "फेणी" निव्वळ राजाश्रय मिळाल्यामुळे आम्ही तयार करू शकलो तसा राजाश्रय मोहाला दिला गेला नाही. जग एका अतिशय सुंदर अशा दारूला मुकलेले आहे कारण यावर संशोधन झाले नाही. हे लिहिताना मी फक्त इकॉनॉमिक्स कन्सिडर करतो इथिक्स बाजूला ठेवीत आहे. आदिवासींची मोहापासून दारू बनविण्याची पद्धती जगात अतिशय वेगळी आहे, इंटेलेक्चअल प्रोपर्टी राइट्स (IPR) मध्ये तिच्या प्रोसेस ला रजिस्टर करून तिच्यापासून पेटेंट मिळवता येऊ शकतो, इतकी ती वेगळी आहे, परंतु आपल्याकडील माझे अतिशय खराब आणि इंपोर्टेड म्हणजेच अतिशय सुंदर हा भ्रम भारतीयांच्या मनात झाल्यामुळे आमची गोची झाली आहे.

मोह फुलांची भाजी सुद्धा केली जाते, टोळीच्या तेलात फ्राय करून तिखट मीठ टाकून, मोहफुलांची भाजी केली जाते. वाळलेल्या मोहात  चण्याची किंवा लाखोरी ची डाळ टाकून मोहांचा वरण सुद्धा केला जात होता. आजकाल गावागावांत भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत, पावसाळ्यातील दिवसात अशा भाज्या मिळत नव्हत्या तेव्हा मोहाचे वरण सुद्धा केले जात होते. जवस आणि मोह भाजून व कुटून सुपारी सारखे खेड्यामध्ये खातात. मोहफुले पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी काढून ते शिजवले जाते, ते अगदी शहदासारखे बनते त्याला पोळी सोबत खाल्ले  जाते. कधी कधी यात मुरले टाकून त्याचे लाडू तयार केले जातात, मोहाची वाळलेली फुले भाजून त्यात गूळ टाकून त्याचे लाडू बनवले जातात तर कधी पीठ टाकून त्याचे वडे म्हणजेच मूठ्ठे बनवतात, भंडाऱ्याकडे यांना मोहाचे बुढें असे म्हणतात, याला मोहाचे बोंड असेही म्हटले जाते. बुड्ढे गरम असतात, त्यांनी पोट भरतो यामुळे खोकला होत नाही

मोहापासून आणखी एक पदार्थ मिळतो तो म्हणजेच टोळ होय. मोह संपल्यानंतर फुलांचे ऐवजी फळ लागते, तो म्हणजे टोळ होय. टोळीचे तेल काढले जाते, आयुर्वेदात या तेलाला  महत्त्वाचे स्थान आहे. हात पाय दुखल्यास खूप थकल्यास आम्ही मेडिकल मधून अनेक तेल विकत घेतो, टोडीचे तेल गरम करून हात-पाय चुडा आणि दहा मिनिटात तुमच्या शरीराला मिळालेला आराम स्वतः अनुभव घेऊन पहा. टोळीचे तेल डोक्याला लावतात, याला अमिताभ बच्चन सारख्या एखाद्या माणसाने नवरत्न सारखी फक्त एडवर्टाइज करायची गरज आहे, तो सातासमुद्रापार विकला जाईल याची शंभर टक्के खात्री आहे. तीस वर्षांच्या अगोदर गावातील लोकांनी टोळीच्या तेलाची भाजी फ्राय केली आहे, देवळात टोळीच्या म्हणजेच मोहाच्या तेलाचा दिवा लावला गेला आहे, आधी गावागावांमध्ये तेलाचे घाणे असायचे, टोळ टाकून त्यात तेल वेगळे आणि ढेप वेगळी केली जात होती, जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक होती.  परंतु या सर्व गोष्टींना आता आम्ही मुकलो आहोत. आमच्या विकासाचा मॉडेल जंगल, त्यातील पदार्थ या सगळ्यांचा नाश कसा होईल आणि विदेशातून आलेले बाजारू पदार्थ आमच्या घरापर्यंत कसे येतील असाच आहे. 1955- 56 च्या आसपास महाराष्ट्र बनायच्या अगोदर आणि नागपूर राजधानी असताना सरकारने एक शासन निर्णय काढला होता. या शासन निर्णयात म्हटले गेले होते की मोहाची झाडे तोडून टाका त्यापासून आदिवासी दारू बनवतात आणि त्यांचे जीवन नाश पावते, याच शासन निर्णयात असेही म्हटले गेले होते की आदिवासींच्या जीवनात टोळीचे खूप मोठे महत्त्व आहे म्हणून टोळीच्या झाडांचे संरक्षण झाले पाहिजे. जंगलातील पदार्थांबाबत सरकारचा किती अभ्यास आहे ते या शासन निर्णयातून स्पष्ट होते.

टोळीच्या आतील बियांपासून आंघोळीची साबणे तयार केले जातात, पिकलेल्या केळीचे पिवळ्या रंगाचे सालटे खायला गोड असते लहानपणी आपण सर्वांनी ती खाल्ली असतील, पावसाळ्यात स्वयंपाक झाल्यानंतर गरम चुलीत काही टोळी टाकतात, त्या वासाने साप घरात येत नाही असा समज होता आणि तो खरा सुद्धा होता.  टोळ बाळंतीन बाईला खायला देतात, टोळ खाल्ल्यामुळे तिला चांगला दूध देतो असा समज आहे. टोळीपासून खाण्याचे अनेक पदार्थ सुद्धा बनवले जातात.

मोहाचे झाड अत्यंत उंच असल्याने आणि तप्त उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असल्याने या झाडाचे पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत मोठे महत्त्व आहे, अनेक प्राणी आणि पक्षी यांचा आश्रय म्हणजेच मोह आहे. मोहाच्या झाडावर अनेक वानर येऊन मोहफुले खातात आणि नशा आली की झाडावर धिंगाणा करतात. अस्वल, गावठी डुक्कर, रान डुक्कर, ससा, सांबर, नीलगाय, शेळ्या, गाई, बैल, हरीण हे सर्वच प्राणी मोहफुले खात असतात. या झाडाची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी इतर कोणत्याही झाडांपेक्षा जास्त आहे.

एवढं सगळं असताना महाराष्ट्रात मात्र आज महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या वतीने सरसकट मोहाची झाडे सुद्धा कापली जाऊन त्या ठिकाणी फक्त सागवन आणि बांबू लावला जातो, मागील चार महिन्यात वडसा(गडचीरोली-चंद्रपुर सीमेगत) जवळील 11 गावांतील  सर्वच झाड सरसकट कापली गेली, गावातील गावकऱ्यांनी किमान मोहाची झाडे कापू नका फळांची झाडे कापू नका अशा प्रकारची विनंती शासनाला केली परंतु त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामसभा आता सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. ज्या सागवणाला लावले जाते त्याची बायोलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटी किती ? याचा आपण कधीच विचार करत नाही. सागावणाच्या झाडावर एक  पक्षांचा घरटा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशा प्रकारची पैज लावायची माझी इच्छा आहे.
 
हे सर्व होताना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती अशी की मोहाचे झाड राज्याचे झाड होण्यासाठी आपण काही हातभार लावू शकतो का ? सध्या आंबा हा महाराष्ट्राचा राज्य झाड आहे, परंतु आंब्याच्या तुलनेत मोह हा कल्पवृक्ष समजला जातो. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आंब्यापेक्षा मोह जास्त महत्वाचा आहे…

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links