BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1975 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

वूमनिया कट्टा विशेष लेख ....... "या" दिपालीचा जीव वाचला ... !!!..सौ. स्मिता गालफाडे, शिक्षिका  

"या" दिपालीचा जीव वाचला ... !!!

न्यूज कट्टा / भंडारा, २७ मार्च 

 

सौ. स्मिता गालफाडे, शिक्षिका  

 

वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने समाजमन ढवळून निघालेय.. तिने लिहिलेली सुसाईड नोट वाचून तर मन गलबलले...  स्त्री...   तिचे दिसणे,  तिचे राहणे,  तिची बुद्धिमत्ता..  सारे सारे क्षणात नष्ट करणा-या विकृतींची वाढ होतेय.

खरेच सहजच आत्महत्येचा विचार कोणी करत नाही..बरेच संघर्ष झेलल्यावर सगळेच मार्ग बंद झाल्यामुळे आगतिकतेत हा विचार बळ धरतो..समूपदेशन करणारे कोणीच नसते...विश्वासाने कोणाला सांगायला जावे तर गोपनीयता राखली जाईल की नाही, त्रास वाढेल का ही भीती...

दोन महिन्यांपूर्वी शाळेत आम्ही महिला तक्रार निवारण मंच स्थापन केला. प्रसार माध्यमांवर ही बातमी व वृत्तपत्रीय कात्रण झळकले... त्याच दिवशी एका महिलेचे अनेक संदेश मला माझ्या नंबरवर आले. मला न्याय मिळवून द्या, मी पोटाच्या आजाराने त्रस्त आहे.. माझी बदली दूर्गम भागात झालीय. मी कोणाला सांगू? काय करु?? कृपया मला वाचवा मला जगायचेय.. नाव माहित नाही. कोण माहित नाही. माझा मंच शाळेसाठी काम करणारा. मीच  विचारात पडले.. ही महिला शासकीय कर्मचारी.. इतर विभागातल्या महिलेची समस्या सोडवण्याचे धाडस करावे की नाही?? या विचारांत  मी स्वत:ला सक्षम केले. कोणी ही असो. मदतीची याचना करतेय ना मग जीव गेला तरी बेहत्तर पण तिला मदत मिळवून द्यायचे मी ठरवले. 

कोणत्याही शासकीय निमशासकीय मंचावर मी सदस्य नाही किंवा कशाच्या आधारे मी मदत करण्यास पुढे जाऊ हा विचार मनात आला. पण एका महिलेने दुस-या महिलेस मदत करणे गैर नाही..ना मग झाले. मी हालचालीस लागले. भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक( सन्मा.वसंत जाधव) व अप्पर पोलिस अधिक्षक (सन्मा.अनिकेत भारती) यांचे नंबर्स मिळवले. फक्त एकदा या 'दिपाली' चे म्हणणे ऐकून घ्या, दखल घ्या म्हणून चारच ओळींचा संदेश त्यांच्या वॅाट्स अॅपवर पाठवला. माझे चूकत असल्यास दंड द्या पण एकदा या महिलेचे समूपदेशन करा अशी विनंती केली..  आणि तेव्हाच माझे मन केलेल्या कृत्याची सार्थकता व समाधान देऊन गेले. काही ही होवो. आपण प्रामाणिकपणे काम करतोय ना मग कशाला घाबरायचे या विचारात मी अधिक कणखर झाले.

माझ्या मॅसेजला पोलिस खात्यातल्या या दोन्ही वरिष्ट अधिका-यांचे उत्तर आले. तात्काळ दखल घेऊन या दिपालीस त्यांनी मुख्यालयात बोलावून वेळ दिला, समजून घेतले. एवढेच नाही तर तिच्या जगण्याला पाठबळ दिले.. खरेच माझ्या जिल्ह्यातल्या या संवेदनशील वरिष्ठ पोलिस अधिकारी वर्गाबद्दलचा माझा आदर अधिक वृद्धिंगत झाला.. किती संवेदनशील असतात काही अधिकारी. हाताखालच्या कर्मचा-यांना माणूसपणाची वागणूक देणारे. अनेक विभागातल्या महिलांना त्याच विभागाच्या वरिष्ट अधिकारी वर्गाने समजून घेतले तर अनेक दीपालींचा जीव वाचेल. कच्च्या कानांच्या अधिका-यांनी आजुबाजूच्या  गोतावळ्यापासून लांब राहून स्वत: निर्णय घ्यावेत... महिलांची होणारी प्रगती पाहून...आपण कमी पडतोय हा स्विकार करुन इतर महिलांनीही स्वत:ला सक्षम तयार करावे.एकमेकांच्या मदतीने नौकरीतले व्यवहार सुरळित करण्याचा प्रयत्न करावा. 
अनेक महिला व मुलामुलींसाठी शाळेत मंच निर्माण करुन त्यांच्या हक्कासाठी, शिक्षण व्यवहार सुलभ करण्यासाठीच्या माझ्या कामाला चोवीस वर्ष पूर्ण झाली. सहजपणे शक्य असतील तर  सोडवता येतील ते गुंते सोडवावेत. चौकटीच्या बाहेर जाऊन धाडस करताना  मला ही अनेक वाईट गोष्टींना, विकृतींना समोर जावे लागले. पण त्याचमुळे अधिक सक्षम करणारे अनुभव आले.अनेक कायदे व त्यांचा अभ्यास करता आला. त्या काळात माझ्या शिक्षण विभागातल्या अधिकारी वर्गाने माझी वेळीच दखल घेतली नसती तर अनेकदा माझी पण दीपाली झाली असती...

कोणीतरी दखल घ्यायला हवी. मनातले बोलण्यासाठीचे, विश्वासाचे मंच निर्माण व्हावेत. संवेदना हरवायला नकोत. समाजातल्या उच्चशिक्षित दीपालींचा असा सहजासहजी बळी जायला नको.. अस्वस्थ..
दीपाली, भावपूर्ण श्रद्धांजली तुला..!!!

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links