BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

4621 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


अहमदनगर

नेगेटिव बातम्यांच्या गर्दीत एक 'पॉजिटिव' लेख   | "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....!!"

नेगेटिव बातम्यांच्या गर्दीत एक 'पॉजिटिव' लेख  

"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....!!"

 

न्यूज कट्टा विशेष

नारायण मंगलारम

 "बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही ....!!"

असं सांगणारा आणि "जिंदगी और मौत, तो उपरवाले के हात मे है जहाँपनाह, उसे ना आप बदल सकते है ना मै.....!!" असे म्हणत मृत्यूच्या छायेतही आल्या दिवसावर भरभरून प्रेम करणारा, मनसोक्त जीवन जगणारा 'आनंद' आपल्या सर्वांच्या काळजात घर करतो. पण असेच जगण्यावर शतदा प्रेम करणारे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा खरंच नतमस्तक व्हायला होतं.
 

 ''तुमच्या हातात आता शेवटचा एक महिना आहे, तुमची व्याधी अगदी शेवटच्या स्टेजला पोहचली आहे.''

कुठल्याही मसालेदार हिंदी चित्रपटात शोभून दिसणारा हा संवाद नागपूरच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात खरंच घडला आहे. रुग्ण होते भारतातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती, एकाच वेळी व्यवसायाने डॉक्टर असतांना, बॅरिस्टर, आय. ए. एस., आय. पी. एस., भारतातील सर्वात तरुण आमदार, सतरा खात्यांचे मंत्रीपद भूषवणारे मंत्री, खासदार, चित्रकार, गायक, व्याख्याते आणि बरेच काही असणारे श्रीकांत जिचकर. त्यांना रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली होती आणि व्याधी शेवटच्या स्टेजला असल्याने जास्तीत जास्त एक महिना ते जगू शकतील अशी डॉक्टरांची अटकळ होती. पण एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपल्या अंगच्या गुण वैशिष्ट्याने तो पर्यंतच्या छोट्या आयुष्यात अनेक किर्तीमान रचणाऱ्या श्रीकांतजीना नियतीच्या या खेळापेक्षा आपल्या आयुष्यातील ज्ञान घेण्याचा आणि देण्याचा खरा आनंद खुणावत होता. त्यातूनच ज्याचा मृत्युदर जवळजवळ शत प्रतिशत आहे अश्या या असाध्य समजल्या गेलेल्या कर्करोगावर सुद्धा त्यांनी आपल्या जबरदस्त आंतरिक प्रेरणा आणि जगण्याच्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर मात केली. कर्करोगावर यशस्वी मात केल्यावर थांबतील ते श्रीकांतजी कुठले, उलट पुढच्या आयुष्यातही त्यांनी ज्ञान ग्रहण करण्याचे व्रत सुरूच ठेवतांना संस्कृत भाषेतून डी. लिट. ही पदवी प्राप्त केली, तसेच नागपूर येथे 'संत कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची' स्थापना करून त्याचे कुलगुरूपदही भूषवले. आहे ना थक्क करणारी, जादूई कथांनाही मागे टाकणारी अशी ही प्रेरणादायी कथा.

एक अवलिया आपल्या जीवन जगण्याच्या आंतरिक उर्मीतून, बळातून आणि आयुष्यावरील उत्कट प्रेमातून, कितीही संकटे आली तरी आयुष्यावर प्रेम करा, आयुष्य आपल्याला 'आनंद' देईल हा संदेश देऊन जातो. श्रीकांतजी हे आपल्याला चांगले परिचित असणारे एकच उदाहरण आहेत असे नव्हे, डोळसपणे आपण आजूबाजूला पाहिले तर जीवन जगण्याचा उदंड आशावाद आपल्यात निर्माण करणाऱ्या कैक विभूती आपल्याला आपल्या आसपास दिसतात.

'देवा वाटल्यास माझे प्राण घे, पण आम्हाला विश्व कप दे .....!!'

अशी करुणा भाकणारा, देवाकडे प्रार्थना करणारा युवराज सिंग - भारतीय संघाच्या धडाकेबाज षटकारांच्या या बादशहाच्या - पदरात क्रिकेटचा विश्व कप तर पडला पण सोबतच पोटाचा कर्करोगही घेऊन आला. जिथे माझ्या तुमच्या सारख्या धडधाकट माणसाला एक क्रिकेटचा सामना खेळण्याची तंदुरुस्ती मिळवणे कर्मकठीण असते, तिथे या कर्करोगाच्या दुर्धर आजारावर मात करत युवराज सिंगने पुन्हा एकदा क्रिकेटचे मैदान गाठले, नुसते गाठले नव्हे तर गाजवले. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पुन्हा मजल मारली, अगदी अलीकडे युवराज आपल्याला 'वर्ल्ड मास्टर सिरीज' मध्ये त्याच जोशात पुन्हा एकदा तळपल्याचे दिसले - हे सगळं कशाच्या जोरावर. मित्रांनो मला वाटत फक्त आणि फक्त त्याच्या क्रिकेटवरच्या आणि पर्यायाने आयुष्यावरच्या प्रेमातूनच.

जी गोष्ट श्रीकांतजींची, युवराजची तीच बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त, प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे, मॉडेल लिसा रे, अभिनेता दिग्दर्शक राकेश रोशन, अनुराग बसू आणि माझ्यासाठी माझा जगण्याचा आदर्श असणाऱ्या माझ्या आईची. (माझ्या आईसकट हे सर्वजण कॅन्सरवर यशस्वी मात करून सर्वसामान्य जीवन जगत आहेत). आलेल्या संकटाला भीक घालून हातपाय गळाले असते तर आज श्रीकांतजी, युवराज, संजूबाबा किंवा मनीषा कोईराला या लेखात स्वतःचे स्थान मिळवू शकल्या असत्या का?  उलट त्यांनी या संकटाशी दोन हात करून त्याला चितपट केले आणि विजेता म्हणून आज आपल्या समोर ते आले आहेत.

या सर्वांमध्ये एक समान धागा मला दिसतो. तो धागा आहे, हजार संकटे आली तरी त्यावर मात करून पुन्हा आयुष्याचा नितळ आनंद घेण्याच्या आशावादाचा. संकटाला आपल्यावर हावी न होऊ देता आपणच त्या संकटाचा खरपुस समाचार घेणाऱ्या जिगरबाज वृत्तीचा. हा आशावाद, ही जिगरबाज वृत्ती अंगिकारली तर आज आपल्या समोर उभे असणारे कोव्हिडचे हे संकट इतके भयावह, जीवघेणे वाटेल का हो ...? मग त्याच्या भीतीच्या, दहशतीच्या छायेत आपण आपले जीवन जगणे सोडणार आहोत का? आयुष्याचा निर्मळ, निखळ आनंद घ्यायचा सोडणार आहोत का?

      'या ओठांनी चुंबन घेईन हजारदा ही माती ,
      अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी …...!!'

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या प्रसिद्ध गीतातील या ओळी, ऐंशी लक्ष योनीतुन गेल्यावर मानव जन्म मिळालेल्या मानवाचे, आपले आपल्या जन्मावर, आपल्या जगण्यावर खरंच इतकं प्रेम आहे का....? आणि तसे ते असेल तर छोट्या मोठ्या संकटाने जगण्याची आशा सोडली पाहिजे का? आजच्या या हजारात दोन टक्के मृत्यदर असणाऱ्या कोरोनारुपी राक्षसाची खरंच इतकी दहशत आपण बाळगली पाहिजे का ....? भीतीचा हा बागुलबुवा आपल्यावर हवी होऊन दिला पाहिजे का? ( अर्थात काळजी घ्या,पण काळजी करू नका).
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी - या ओळीप्रमाणे अनंत जिवावरची संकटे आल्यावर देखील मी, आम्ही तर निवड केली आहे 'जिंदगी'ची, जीवनाची, 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्याची...!!' आणि तुम्ही ...?

✒️ नारायण चंद्रकांत मंगलारम
    मोबाईल : ९२७२५९०११९

ईमेल : narayanmangalaram1980@gmail.com

अहमदनगर, महाराष्ट्र 

(लेखक हे राष्ट्रपति पुरस्कार 2020 प्राप्त जि. प. शिक्षक व कृतीशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) चे राज्य सहसंयोजक आहेत.)

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links