BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

1926 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

ग्रीनफ्रेंड्स ने अनुभवले रात्रीच्या चांदण्या आकाशात  'सुपर मुन'  तसेच  'मुन रिंग'

ग्रीनफ्रेंड्स ने अनुभवले रात्रीच्या चांदण्या आकाशात  'सुपर मुन'  तसेच  'मुन रिंग'

दोन विलक्षण खगोलीय घटना

 

न्यूज कट्टा

लाखनी, दि. 28 एप्रिल : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे निसर्गअभ्यासासोबत अवकाशात घडणाऱ्या अनेक खगोलीय घटनांचे निरीक्षण व अभ्यास सातत्याने मागील 16 वर्षांपासून केला जात आहे. याच उपक्रमातंर्गत या आठवड्यात चंद्र उपग्रहाच्या दोन खगोलीय घटना रात्रीच्या चांदण्या आकाशात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब च्या सदस्यांना अनुभवता आल्या.

     दिनांक 27 एप्रिलला चैत्र पौर्णिमेला 'सुपर मुन' चा अनुभव तर 25 एप्रिलला 'मुन रिंग' अर्थात चंद्रखळे किंवा 'हॅलो ऑफ मुन'चा  विस्मयकारक अनुभव घेता आला. चैत्र पौर्णिमेच्या 'सुपर पिंक मुन' बद्दल अधिक माहिती देताना खगोलअभ्यासक व  ग्रीनफ्रेंड्स चे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले की पौर्णिमेला चंद्र साधारणपणे 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. पण काल चैत्रपौर्णिमेला  चंद्र अधिक जवळ म्हणजे 3 लाख 57 हजार किलोमीटर अंतरावरून पृथ्वीच्या सभोवताली मार्गक्रमण करीत होता. त्यामुळे चांद्रबिंब 14 टक्के आकाराने मोठा व 30 टक्के अधिक तेजस्वी भासत होता. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत असतो त्याला 'सुपरमून' किंवा 'पेरिगी फुल मुन' असे संबोधतात. यामुळेच यावर्षीच्या या पहिल्या मोठ्या चंद्रबिंबाला 'सुपरमून' असे म्हंटले गेले. त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला  रंगानुसार  वेगळे नावे देण्याची प्रथा सुरू झाल्याने ह्या चैत्र पौर्णिमेला 'पिंक मुन' असे म्हणतात म्हणजे एका अर्थाने 'सूपर पिंक मुन' असे नामकरण ह्या घटनेचे केले गेले अशी माहिती त्यांनी पुरविली.

     यावेळी त्यांनी उपस्थित ग्रीनफ्रेंड्स, अंनिस व नेफडोच्या सदस्यांना ह्या चांद्रबिबाचा 14 टक्के मोठा भाग दिसल्याने दुर्बीण व टेलिस्कोप मधून चांद्रबिंबावरील विविध विवरे व त्यांचे जुन्या खगोलशास्त्रज्ञांचे स्मृतिप्रीत्यर्थ दिलेले नावे जसे टायको, कोपर्निकस, अरिस्टार्चस, पोलोडीनिअस, गॅसेनडी, केप्लर, प्लेटो यांच्याबद्दल व त्यांच्या आकाराबद्दल माहिती दिली व प्रत्यक्ष स्थान त्यांना टेलिस्कोप व दुर्बिणीद्वारा दाखविले. तसेच विवरकिरणे, काळी ज्वालामुखीपासून तयार झालेल्या सावलीसदृश्य जागेबद्दल माहिती देऊन त्याचे विविध इंग्रजी नावे त्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून समजावून दिले. चंद्रावरील दहा प्रमुख भौगोलिक घटना कुठे आहेत तसेच त्यावरील डोंगररांगा, दऱ्या, त्यांचे आकार, उंची, खोली, त्यांचे इंग्रजी नावे व त्यांचे स्थाननिश्चिती त्यांनी दुर्बिणीद्वारा व चार्टद्वारा समजावून देत अनेक खगोलविज्ञान घटनांची माहिती यावेळी दिली.

     त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी चांद्र बिंबाभोवती जे गोल कड्याप्रमाणे 'मुन रिंग' अर्थात 'चंद्रखळे' किंवा 'हॅलो ऑफ मून' तयार झाले होते ह्या विस्मयकारक खगोलीय घटनेचे दर्शन रात्रीच्या चांदण्या आकाशात  ग्रीनफ्रेंड्स, अंनिस व नेफडो च्या सदस्यांना घडविले व त्यावर वैज्ञानिक माहिती देऊन गैरसमज, भीती, शकुन-अपशकुन तसेच अंधश्रद्धा दूर केल्या. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आकाशात 26 हजार फूट उंचीवर षट्कोनी बर्फाळ कण असले तर प्रकाशाच्या अपपरिवर्तनाने ते गोलाकार रिंगण चंद्राभोवती तयार होते. ही घटना विशेष करून मार्च एप्रिल तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरला अवकाशात जास्त बघायला मिळते. बर्फाळ देशात व भागात याचे प्रमाण जास्त असते. अशाच प्रकारची रिंग सुर्याभोवती सुद्धा कधी कधी तयार होते त्याला 'सोलर रिंग 'अथवा 'सोलर रेनबो' वा 'हॅलो ऑफ सन' असे संबोधिले जाते अशी माहिती त्यांनी पुरविली.

     यावेळी त्यांनी इसरो व नासाच्या चांद्र मोहिमांची माहिती दिली व ए. पी. जे. अब्दुल कलामांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती तसेच इतर ग्रह, नक्षत्रे, रास यांचा प्रत्यक्ष परिचय सर्वांना घडवून दिला. वरील दोन्ही खगोलीय घटनेच्या निरीक्षण उपक्रमाला कोरोना आजारांचे सर्व संकेत, नियम व सुरक्षितता पाळून प्रा. अशोक गायधने, अथर्व गायधने, पूजा रोडे,अर्णव गायधने, योगिता रोडे, प्रा. अर्चना गायधने, अश्विन रोडे यांनी तसेच ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य, दिनकर कालेजवार, पंकज भिवगडे, दिलीप भैसारे, योगेश वंजारी यांनी सहकार्य केले. या दोन्हीही खगोलीय घटना अनुभवताना अ. भा. अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडाराचे यावेळी प्रामुख्याने सहकार्य लाभले. 

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links