BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2325 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखनी

दोन दिवसांच्या परिश्रमानंतर खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका

दोन दिवसांच्या परिश्रमानंतर खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका

- ग्रीनफ्रेंड्स व वनविभागाने घेतले सतत परिश्रम; जखमी वानराची पण सुरक्षित सुटका
 

न्यूज कट्टा

लाखनी, दि. 10: तब्बल दोन दिवस चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ग्रीनफ्रेण्ड्स लाखनीच्या सदस्यांनी वन विभाग व ग्रामवासीयांच्या मदतीने खोल विहिरीत पडलेल्या अजगरची सुटका केली. इतकेच नव्हे तर ग्रीनफ्रेण्ड्सच्या युवा कार्यकर्त्यांनी जखमी अवस्थेतील एक वानर, एक मण्यार व एक तस्कर सर्प पकडून सुरक्षित अधिवासात सोडले.

     लाखनी येथून 8 किमी अंतरावर असलेल्या सालेभाटा गावातील कृष्णा खंडाईत यांच्या 30 फूट खोल विहिरीत अजगर साप पडला असल्याची माहिती लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचा निसर्गमित्र पंकज भिवगडे याला मिळाली. त्याने तात्काळ ही माहिती ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना दिली. विहिरीला कड्या नसल्याने व जुनाट बांधणीची असल्याने अजगर वन्यजीव 1972 च्या राखीव वनसूचीत असल्याने त्याला बाहेर काढण्याचा मोठा प्रश्न आं वासून सर्वांसमोर तसेच सालेभाटा ग्रामवासियांसमोर उभा राहिला. ग्रीनफ्रेंड्सच्या ग्रूपवर माहिती टाकल्यावर ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने व  मानद वन्यजीव रक्षक प्रा. नदीम खान यांनी तत्परतेने हालचाल करीत विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी यांना माहिती दिली. त्यांनी लाखनी वनविभागचे वनक्षेत्राधिकारी ए. जे. मेश्राम यांना कळविले.

     तत्पूर्वी घटनास्थळावर ग्रीनफ्रेंड्सचे निसर्गमित्र- सर्पमित्र पंकज भिवगडे, मयूर गायधने, दर्वेश दिघोरे यांनी स्थानिक  ग्रामवासीयांचे सहकार्य घेत सुरक्षा बेल्ट मागविला. सुरक्षा बेल्ट व दोर मयूरला बांधण्यापूर्वी विहिरीत विषारी वायू नसल्याची खात्री करून घेण्यात आली. यानंतर मयूर सुरक्षा साधने घेत खाली उतरला पण तळाशी कपारीत असलेल्या छिद्रामध्ये हा 7 फुटाचा अजगर आतमध्ये गेला त्यामुळे त्याला काढणे अवघड झाले. दरम्यान लाखनी वनक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक कृष्णा सानप व तुकाराम डावखरे, वन्यजीवप्रेमी रितेश कांबळे हे घटनास्थळी पोहचले. इकडे ग्रीनफ्रेंड्सचे सदस्य वनविभागाचे सानप व डावखरे यांचे सहकार्याने पुन्हा मोहीम आखली पण 2 तास प्रयत्न करूनही अजगराला बाहेर काढणे अशक्य झाले.

     मोहीम स्थगित करून दुसऱ्या दिवशी दुपारी भंडारा वनविभाग सुटका पथकाचे (रॅपिड रेस्क्यू युनिट) प्रमुख अनिल शेळके, ग्रीनफ्रेंड्सचे पंकज भिवगडे, सर्पमित्र मयूर गायधने, दर्वेश दिघोरे, अनुराग गायधने भंडारा हे व लाखनी वनविभागाचे वनरक्षक कृष्णा सानप तसेच टेंभुरणे यांचे पुन्हा प्रयत्न सुरू झाले. रेस्क्यू टिम भंडाराचे अनिल शेळके व ग्रीनफ्रेंड्सचा सर्पमित्र मयूर गायधने विहिरीत सुरक्षा साधने वापरून खाली उतरल्यावर त्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नाने अजगराला कपारीतल्या बिळातून बाहेर काढले व सर्वांनी एकच सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर पंचनामा करून नजीकच्या जंगलात अजगराला सुरक्षित सोडण्यात आले.

     त्याच सायंकाळी लाखनी जवळील जे. एम. सी. कंपनी प्लान्टच्या शेताजवळ जखमी अवस्थतेतील एका वानराबद्दल माहिती ग्रीनफ्रेंड्सचा सर्पमित्र सलाम बेग मिर्झा याला मिळाली. पण वानर चवताळून धावत असल्याने त्याने याबद्दल ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांना माहिती दिल्यावर त्यांनी सर्पमित्र मयूर गायधने मार्फत लाखनी वनविभागाला कळविले. लाखनी वनरक्षक कृष्णा सानप व इतर वनकर्मचारी यांनी जखमी वानरावर जाळे टाकून त्याला ताब्यात घेऊन त्याची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर वैद्यकीय उपचार करून त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सायंकाळी गडपेंढरी गावी मोठा आकाराचा विषारी पट्टेरी मण्यार सापाला मयूर गायधने तर पंकज भिवगडे व नितीन निर्वाण यानीं तस्कर सापाला बाजार वार्डातुन ताब्यात घेतले. अशाप्रकारे मातृदिनी चार मुक्या जीवांची सुरक्षित सुटका करण्यात येऊन त्यांना जीवदान देण्यात आले. ह्याबद्दल ग्रीनफ्रेंड्सच्या निसर्गमित्रांचे व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

     ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, सर्व पदाधिकारी, निसर्गप्रेमी नागरिक तसेच जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक प्रा. नदीम खान व शाहिद खान यांनी सुद्धा ग्रीनफ्रेंड्सच्या निसर्गमित्रांचे  व वनकर्मचारी लाखनी व रेस्क्यू टीम भंडाराचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links