BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2430 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 
न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, २३ जुलै
 
गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस बरसल्याने ३३ पैकी ३३ दरवाजे उघडले असून ३० दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत, तर ३ दरवाजे १ मिटरने उघडले आहेत. सध्या धरणातून 3929.127 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
विदर्भात बुधवारपासून पाऊसाने जोर धरला आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावासाची रिपरिप सुरू होती. सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळकच पाऊस सुरू आहे. मात्र, मध्यप्रदेशात पाऊस जास्त असल्यामुळे आजची स्थिती उद्भवली. भंडारा जिल्ह्यातील गावांना तसा धोका काही नाही. कारण गोसीखुर्दपासून वर्धापर्यंत वैनगंगेची वहन क्षमता ९ हजार क्युमेक्स म्हणजे ३ लाख १७ हजार क्युसीक्स आहे. सध्या २००० क्युमेक्स एवढीच पाण्याची पातळी आहे. पण मासेमारांनी नदीमध्ये जाताना सतर्कता बाळगण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे.
 
आज सकाळी ६ वाजता ३ दरवाजे, ८ वाजता ७ आणि १० वाजता १२ दरवाजे, त्यानंतर उर्वरीत, असे एकूण ३३ दरवाजे आत्तापर्यंत उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, नागपूर, मध्यप्रदेशातील मंडला, बालाघाट, शिवणी, बैतुल, छिंदवाडा आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव यांचा समावेश आहे. तीन राज्यांतील ९ जिल्ह्यांत सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरण भरले. आज सकाळपासून तिसऱ्यांदा स्थिती बदलली आहे. या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ही स्थिती आली असल्याचे गोसीखुर्द प्रशासनाने सांगितले. आजही पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे गोसीखुर्दचे आणखी काही दरवाजे उघडले जातील, अशी शक्यता वर्तविली गेली आहे.
 
नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १५४ गावांपैकी १३० गावांना जास्त धोका आहे. चंद्रपूरचा जिल्ह्यातील पावसाचा परिणाम गोसीखुर्दवर होत नाही. पण गोसीखुर्द ओव्हरफ्लो झाला तर गडचिरोली जिल्ह्याला धोका संभवतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १०१ टक्के पाऊस झाला. भंडारा आणि गोंदियाचा विचार केल्यास अजूनही पावसाची गरज आहे. आतापर्यंत गोंदिया २२ टक्के, तर भंडारा जिल्ह्यात २१ टक्के भातलावणी झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस शेतींसाठी फायद्याचा ठरणार आहे. आज प्रकल्पाचे उघडण्यात आलेले दरवाजे नागपूरच्या पावसामुळे उघडण्यात आले आहेत. मध्यप्रदेशच्या संजय सरोवराने कन्हान पाणी सोडल्यास आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links