किरण केंद्रे साहित्य संमेलनाध्यक्ष तर नारायण मंगलारम स्वागताध्यक्ष
- ‘किशोर’चे संपादक किरण केंद्रे एटीएम राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रपति पुरस्कृत शिक्षक नारायण मंगलारम स्वागताध्यक्ष
- दुसरे साहित्य संमेलन अहमदनगर येथे 27 फेब्रुवारीला
न्यूज कट्टा ब्यूरो
अहमदनगर, दि. 22 फेब्रुवारी: कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ‘एटीएम’ परिवाराचे दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदनगर येथे संपन्न होत आहे. या राज्यस्तरीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी बालभारतीच्या किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक व साहित्यिक किरण केंद्रे तर स्वागताध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांची निवड करण्यात आल्याची माहिती ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र परिवाराचे राज्य संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांनी दिली आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कृतिशील शिक्षकांचा समूह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सर्वांगीण विकास होण्यासाठी अविरतपणे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘एटीएम’ परिवारमार्फत राज्यात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यासाठी ‘एटीएम’ परिवाराच्या वतीने राज्यातील शिक्षकांना विविध उपक्रमातून मार्गदर्शन करून प्रेरणा दिली जाते. ‘प्रेरणा द्या व प्रेरणा घ्या, आपण सर्व एक आहोत’ या सेवाभावी वृत्तीने राज्यात ‘एटीएम’ परिवार नेहमी कार्य करत असते.
या उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणजे शिक्षकांचे राज्यस्तरीय साहित्यसंमेलन होय. विद्यार्थी हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. शालेय जीवनात शिक्षणाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे. उद्याचे साहित्यिक, लेखक, विचारवंत, शिक्षणतज्ञ विद्यार्थ्यांमधून निर्माण होणार आहेत. त्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळणे गरजेचे असते. शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘एटीएम’ परिवाराच्या वतीने दरवर्षी शिक्षकांसाठी साहित्यसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ऐतिहासिक नगरी म्हणजे अहमदनगर शहरात २७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या संमेलनासाठी राज्यातील अनेक शिक्षक सहभागी होणार आहेत अशी माहिती विक्रम अडसूळ यांनी दिली.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ‘एटीएम’ परिवाराचे मार्गदर्शक व साहित्यिक किरण केंद्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून किरण केंद्रे यांचे अभिनंदन केले जात आहे. किरण केंद्रे हे पुणे येथे पाठ्यपुस्तक मंडळात ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. किरण केंद्रे यांची या शिक्षक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘एटीएम’ परिवाराचे प्रमुख राज्य संयोजक विक्रम अडसूळ, सहसंयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्योती बेलवले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नारायण मंगलारम, ज्ञानदेव नवसरे, उमेश कोटलवार यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'