कोका अभयारण्यात 'टी-16' वाघिणीचे दर्शन
- वन्यप्रेमींत आनंदाची लहर
- वाईल्ड लाईफ फोटोग्राफर दीपक चड्डा यांनी कॅमेऱ्यात टिपले T-16 वाघिणीला
न्यूज कट्टा ब्यूरो
भंडारा, दि. 25: तब्बल दोन वर्षानंतर वन्यप्रेमींना भंडारा शहरालगत असलेल्या कोका अभयारण्यात T-16 वाघिणीचे दर्शन झाले असून वन्यप्रेमीत आनंदाची लहर आहे. दोन वर्षाआधी T-10 म्हणजेच 'मस्तानी' ही वाघीण आपल्या पिलांसोबत कोका वन्य भ्रमंतीला जाणाऱ्या पर्यटकांना दिसायची. कोरोना काळात पर्यटन बंद होते व मागील दोन वर्षात कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन होत नव्हते. यामुळे कोकाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील उमरझरी आणि कोका क्षेत्रात वावरणारा T-13 हा नर वाघ कधी कधी कोका अभयारण्यात दिसायचा मात्र मादा वाघिण पहिल्यांदाच पर्यटकांना दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
भंडारा येथील वन्यप्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर दीपक चड्डा नुकतेच जंगल सफारीला गेले असता त्यांना T-16 या वाघिणीचे दर्शन झाले. पहिल्यांदाच कोका येथे T-16 ला आपल्या कॅमेरात दीपक चड्डा यांनी टिपले आहे. पर्यटकांना झालेले टी-16 चे दर्शन ही आनंदाची पर्वणि ठरली असून कोका वन्यजीव अभयारण्यात सफारीला आता सुगीचे दिवस येतील अशी आशा इथल्या निसर्गप्रेमी व गाईड लोकांनी व्यक्त केली. T-16 वाघिणीसोबत लहान बछडे असून येणाऱ्या काळात वन भ्रमंती करणाऱ्यांना नक्कीच या व्याघ्र परिवाराचे दर्शन घडून येईल अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली.
'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'